सुशीलकुमार यांचे विधान चुकीचे – जयंत पाटील

वार्ताहर : काँग्रेसचे माहित नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस तरी थकलेला पक्ष नसून पक्षाचे नेतृत्व आज ८० वर्षांचे तरुण नेते करीत आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसबाबत केलेले विधान चुकीचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही पक्ष थकले असून, भाजप-शिवसेनेसारख्या बलाढय़ विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर त्यांनी एकत्र येण्याची गरज काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे बोलताना व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर आज राज्यात सर्वत्र उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.

पाटील म्हणाले, की गेल्या काही निवडणुकांमध्ये आमच्या वाटय़ाला पराभव आले असले किंवा अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी आमचा पक्ष अजून थकलेला नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या वयातही पुन्हा पक्षाला उभारी देतील असा आम्हाला विश्वास वाटतो असेही मत पाटील यांनी व्यक्त केले.

सुशीलकुमारांच्या सदिच्छा

काँग्रेसनेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुशीलकुमारांचे वक्तव्य म्हणजे ‘सदिच्छा’ असल्याचे नमूद केले. कष्टकरी व प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, की काँग्रेस व  राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्रिकरण झाल्यास उलट या दोन पक्षांमध्ये अधिक संघर्ष होईल आणि या दोन्ही पक्षांची शक्ती कमी होईल. त्यापेक्षा या दोन्ही पक्षांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून आघाडी करणेच योग्य ठरेल.