प्रशासनाची धावपळ

पालघर :  पालघर जिल्ह्यात करोनाचे सावट नसले तरी गेल्या तीन दिवसांपासून शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील  ४५ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रशासन हडबडून गेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शहरातील सूर्या कॉलनीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी कुक्कुटपालन केंद्रामध्ये गेल्या तीन दिवसांत ४५ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अचानक या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तो सील करण्यात आला आहे.  या कोंबड्या दगवल्याने पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरच्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन ही बाब लपवालपवी करीत आहे. कोंबड्या दगावल्याने हा बर्ड फ्लू आहे किंवा दुसरे काय आहे हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने घेऊन त्याच पोल्ट्री फार्म परिसरात मोठे खड्डे तयार करून त्यात या कोंबड्या पुरण्यात आल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.