पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानामध्ये मागील महिन्यापासून संभाजी महाराज की राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसण्यावरून वाद सुरू होता. दरम्यान स्वाभिमान संघटनेचा खेड तालुका अध्यक्ष असणाऱ्या गणेश कारले या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कोणी काढला किंवा तसा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटेल आणि उद्रेक होईल अशी धमकीही दिली होती. पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला आहे. यामुळे आज पुण्यात वाद निर्माम होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा रातोरात काढण्याची घटना दोन वर्षापुर्वी घडली होती. त्या पुतळ्याच्या जागी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला जावा अशी मागणी अनेक संघटनाकडून पुणे महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यावरून काही महिने पुणे शहरात चांगलाच वाद देखील पेटला होता.

वाद अद्यापही सुरुच असून यादरम्यान स्वाभिमान संघटनेचा गणेश कारले या तरुणाने उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली. उद्यानात पुतळा बसवल्यानंतर गणेश कारले याने पुतळ्याच्या खालील बाजूस एक भित्तिपत्रक लावले होते. त्यात असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कोणी काढला किंवा तसा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटेल आणि उद्रेक होईल. पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला आहे.