कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो, मग दूध उत्पादकांना अनुदान का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित करत खासदार राजू शेट्टी यांनी ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असे स्पष्ट केले. कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. चर्चा आणि आंदोलन दोन्ही सुरु राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने बोलावले तर चर्चेसाठी जाऊ, असे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री जवळपास दोन तास गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली. पण अपेक्षित तोडगा निघू शकला नाही.  शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका असून कार्यकर्त्यांनीही शांततेने आंदोलन करावे. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना किमान 25 ते 27 रुपये भाव मिळायलाच हवा, ते कसं शक्य आहे हे आम्ही सरकारला दाखवून दिलं आहे, असे त्यांनी नमूद केले.