स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सुरू केलेले आंदोलन शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने २४ नोव्हेंबपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. साखर उद्योगासंदर्भातील विविध संघटना, मंत्रीमहोदय व अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले असल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. यानंतर उपस्थित हजारो शेतकऱ्यांना निर्धार शपथ देऊन आजचे आंदोलन विसर्जित करण्यात आल्याने प्रशासन, पोलीस दलासह कराड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आलेल्या या आक्रमक आंदोलनात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी राज्यकर्त्यांसह साखर कारखानदारांचे धिंडवडे काढले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच संबंधित मंत्री व साखर सम्राटांवर एकच हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांकरवी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय राजू शेट्टी यांना कळविण्यात आला. यावर शेट्टी यांनी याबाबतची माहिती जाहीर केली.

त्यात ऊस दरासंदर्भात राज्य साखर संघ, साखर कामगार संघटना व शेतकरी संघटनांचे नेते व संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांसमवेत व्यापक बैठक घेण्याचे शासन दरबारी मान्य झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ही बैठक होऊन ऊसदरासंदर्भात येत्या २४ नोव्हेंबरपूर्वी सकारात्मक निर्णय व्हावा, दरम्यान, कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये, ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यास पोलीस संरक्षण देण्यात येऊ नये आणि २४ नोव्हेंबर अखेर ऊसदराचा निर्णय न झाल्यास याच ठिकाणी व्यापक आणि आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संबंधितांना अडवू, असाही इशारा शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी यांच्या या भूमिकेनंतर उपस्थित ऊसउत्पादक शेतकरी परतीच्या मार्गाला लागला असून, दिवसभरातील आंदोलन व एकूणच वातावरण सर्वसाधारण राहिल्याच निर्वाळा  प्रशासन सूत्रांनी दिला आहे.