06 April 2020

News Flash

स्वच्छता अभियानाला गती!

कोकणात स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वीपासूनच जागरूकता आहे.

गेल्या २५महिन्यांपासून देशभर स्वच्छता अभियानांतर्गत विशेष परिश्रम घेतले जात आहेत. गेल्या २० वर्षांपासून यासंबंधी विविध उपक्रम राबवले जात असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता दाखवली गेली नाही. गेल्या २५ महिन्यांपासून केंद्र सरकारने हा  प्रतिष्ठेचा केलेला असल्यामुळे देशभरात या मोहिमेत शासकीय यंत्रणा लक्ष घालते आहे.

महाराष्ट्रात काही जिल्हय़ात अतिशय चांगले काम होते आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून देशभर गाजला गेला. कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्हय़ातील कामही अतिशय चांगले आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक चांगले काम लातूर जिल्हय़ाचे असून राज्यात सर्वात कमी प्रतिसाद परभणी जिल्हय़ात मिळतो आहे. औरंगाबाद, धुळे, िहगोली, नांदेड, नंदुरबार, बीड, यवतमाळ या जिल्हय़ात अद्यापि ५० टक्केही काम झाले नाही. कोकणात स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वीपासूनच जागरूकता आहे. वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता व परिसर स्वच्छता याबाबतीत त्यांची मानसिकता बनलेली आहे. याउलट मराठवाडय़ात स्वच्छतेचा अभाव अधिक आहे.

लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची सांगड

गोंदिया जिल्हय़ात स्वच्छतेचे काम अतिशय चांगले झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी जिल्हय़ातील सर्व तालुकास्थानी जाऊन तेथील प्रत्येक गावच्या स्वच्छतेच्या कामाचा आढावा दोन वेळा घेतला. परिणामी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, तहसीलदार ही सर्वच मंडळी कामाला लागली. गावस्तरावर जाऊन प्रत्येक कार्यक्रमात ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, ते महापुरुष गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे फोटो आपण लावता मात्र त्यांची शिकवण अमलात आणली नाही तर आपल्याला रोगराईंना सामोरे जावे लागेल. या प्रबोधनाचा परिणाम सकारात्मक झाला. परिणामी गावोगावी शौचालय बांधणीच्या कामाने वेग घेतला आहे. जिल्हाभरात ८२ टक्के शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत.

अनुदानाचे तातडीने वितरण

शौचालय बांधणीसाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान शौचालय बांधल्यानंतर मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात. अनेक चकरा मारूनही अनुदान मिळत नसेल तर त्याचा परिणाम इतर लोकांवर होतो हे लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी आरटीजीएसमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर तातडीने अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला. एकाही लाभार्थ्यांला अनुदानासाठी एकही चक्कर मारण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेतली.

ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा घरी आठवडय़ाला कोणी ना कोणी भेट देऊन शौचालय बांधणीतील मुख्य अडचण लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी मदत करण्याचा विश्वास दिला. गावोगावी अंगणवाडी सेविका, महिला शिक्षिका यांच्या मदतीने महिलांमध्ये प्रबोधन केले. दारिद्रय़रेषेखालील लोक, पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी यांच्या घरी जाऊन शौचालय बांधणीसाठी भर दिला. त्यातून ९८.५७ टक्के लोकांच्या घरी शौचालय बांधून पूर्ण झाले.

स्वच्छतेची दिवाळी

नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बेलकवडे यांनी जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्याचा सपाटा सुरू केला आहे. सर्व विभागाचे कर्मचारी यांना जिल्हय़ातील विविध मंडल, तालुके यांचे पालकत्व देण्यात आले आहे. दर आठवडय़ाला आठवडाभर झालेल्या कामाचा आढावा घेऊन अडचणी सोडवल्या जातात. प्रत्येक बुधवार हा विकासदिवस म्हणून पाळला जातो व त्या दिवशी स्वच्छतेच्या कामाला अधिक प्राधान्य दिले जाते. आठवडाभरात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी, अधिकारी यांचा सन्मान केला जातो. तालुकास्तरावर संबंधित व्यक्तीचा फोटो सर्वत्र पाठवला जातो. यातून कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

जनजागृतीचे उपक्रम

  • मराठवाडय़ातील बीड जिल्हा हा अतिशय मोठा. ऊसतोड कामगारांची संख्या अधिकारी. शौचालय बांधणीचे प्रमाण अत्यल्प, गरिबी त्यामुळे कुपोषणाचे प्रमाणही अधिक. त्यामुळे या जिल्हय़ातील काम वेग घेणे अवघड.
  • जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी विविध स्तरावर जनजागृतीचे उपक्रम आखले. बीड जिल्हय़ातील लोळदगाव हे हागणदारीमुक्त झाले.
  • त्यामुळे त्या गावातील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण व मुलांच्या आजाराचे प्रमाण शून्य टक्के तर पाच किलोमीटर अंतरावरील शिरोडा हे गाव हागणदारीमुक्त नसल्यामुळे मुलांच्या गळतीचे प्रमाण १९ टक्के तर आजारी मुलांची संख्या ४६.
  • ही तफावत ठिकठिकाणच्या गावात प्रशासनातील मंडळी सांगू लागली. त्यातून गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले.

..निकोप स्पर्धा

स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हय़ात गावोगावी शौचालय बांधणीसाठी ही निकोप स्पर्धा सुरू झाली. त्यातून देशातील हागणदारीमुक्त पहिला जिल्हा होण्याचा मान मिळाला. याच जिल्हय़ाने साक्षरतेच्या बाबतीतही पहिला क्रमांक यापूर्वीच पटकावला आहे.

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल हेमनार यांनी गेल्या वर्षभरात जिल्हय़ातील नागरिकांनी स्वच्छता अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा केला. स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वीपासून केलेल्या कामाचाही लाभ झाला. ज्या गावाच्या कामाची गती कमी आहे त्या ठिकाणी पाठपुरावा केला. काही ठिकाणची गरज लक्षात घेऊन सामुदायिक शौचालये बांधण्यात आली  आहेत. परिणामी ९३ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर १०० टक्के काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2016 2:42 am

Web Title: swachata abhiyan in india
Next Stories
1 नोटाबंदीवरून ‘स्वाभिमानी’मध्ये मतभेद
2 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसाला वसुलीची नोटीस
3 रायगड जिल्हा नियोजन भवनाचे काम रखडले
Just Now!
X