राज्य बँकेकडून लवकरच कारवाई
राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता थकबाकीदार ठरलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना व अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव होणार आहे. यातील सांगोला साखर कारखाना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांचा, तर स्वामी समर्थ साखर कारखाना अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या ताब्यात आहे.
जिल्ह्य़ात एकीकडे उसाची एफआरपी न दिल्यामुळे अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यासह पंढरपूरचा विठ्ठल, मोहोळच्या सिकंदर टाकळीचा भीमा, मंगळवेढय़ाचा संत दामाजी, सोलापूरचा सिध्देश्वर आदी साखर कारखान्यांवर गाळप परवाने नाकारण्याची कारवाई होत असताना आता राज्य सहकारी बँकेने सांगोला व स्वामी समर्थ या दोन्ही थकबाकीदार असलेल्या साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे, असे राज्य बँकेचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजिलेल्या एका बैठकीत सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्यासह संचालक तथा आमदार बबनराव शिंदे, माजी अध्यक्ष तथा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय शिंदे,माजी आमदार दिलीप माने, बबन अवताडे आदी उपस्थित होते.
मुद्दल व व्याजाची रक्कम थकविणाऱ्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे धोरण राज्य सहकारी बँकेने आखले आहे. त्यानुसार सांगोला व स्वामी समर्थ या दोन्ही साखर कारखान्यांची मालमत्तेची जप्ती व लिलाव प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाणार असल्याचे सुखदेवे यांनी सांगितले. यापूर्वी बार्शी तालुक्यातील वैरागच्या कर्ज थकबाकीदार संतनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव रखडला आहे.
कर्ज थकबाकी
राज्य सहकारी बँक व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संयुक्तरीत्या जिल्ह्य़ातील बऱ्याचशा साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला होता. यापैकी संतनाथसह सांगोला, स्वामी समर्थ व संत दामाजी या साखर कारखान्यांनी मुद्दल व व्याजाची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकविली आहे. यात संत दामाजी (१४ कोटी ६० लाख), स्वामी समर्थ (७३ कोटी १७ लाख), सांगोला (६९ कोटी २६ लाख) व संतनाथ (२ कोटी ४२ लाख) याप्रमाणे कर्ज थकबाकी आहे.