ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनमधील निदेशक देवराव येलमुले यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने घाबरून व या आजाराच्या भीतीने या तंत्रनिकेतनमधील तब्बल एक हजार विद्यार्थी घरी निघून गेले आहेत. ऐन परीक्षेच्या हंगामातच विद्यार्थी निघून गेल्याने तंत्रनिकेतनची इमारत ओस पडली आहे. विद्यार्थ्यांनीच अफवा पसरविल्यामुळे हा प्रकार घडला, असे प्राचार्याचे म्हणणे आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने सभा घेऊन विद्यार्थ्यांना परतण्याचे आवाहन केले आहे.
या जिह्य़ात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. हा आजार बळावला असून, सात दिवसांत ३ रुग्णांचा मृत्यू व ५२ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. बुधवार ४ फेब्रुवारीला संतोष पगडपल्लीवार या शिक्षकाचा, १० फेब्रुवारीला रात्री ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनचे निदेशक देवराव येलमुले यांचा, तर ११ फेब्रुवारीला बल्लारपुरातील रफीक शेख या ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व नगर प्रशासनाने आरोग्य विभागासोबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यातही ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही येथे घरोघरी जाऊन स्वाइन फ्लू व आरोग्य तपासणी केली जात आहे. या रोगासाठी डुक्करांपासूनचा संसर्ग कारणीभूत असल्यामुळे नगर पालिका व महापालिका क्षेत्रात ‘डुक्कर भगाओ अभियानह्ण सुरू करण्यात आले आहे. सर्व पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनमधील सुमारे एक हजार विद्यार्थी घाबरून घरी निघून गेले आहेत.
ब्रम्हपुरी तंत्रनिकेतनमध्ये १२७५ विद्यार्थी शिकत आहेत. निदेशक देवराव येलमुले यांच्या मृत्यूनंतर तंत्रनिकेतन परिसरात स्वाइन फ्लूचे विषाणू आहेत, अशी अफवा गावात वाऱ्यासारखी पसरल्याने विद्यार्थ्यांनी पलायन केले आहे. ऐन परीक्षेच्या हंगामात असे झाल्याने या विद्याथ्यरंचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, हा प्रश्न प्राचार्य व अन्य शिक्षकांना पडला आहे. यासंदर्भात तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.डी.लुलेकर म्हणाले, ‘अफवांना ऊत आल्यामुळे विद्यार्थी घरी निघून गेले आहेत. मात्र, यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र लिहून त्यांना परत पाठवण्याची विनंती करणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने या परिसरातील सर्वाची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.’
दरम्यान, या आवाहनानंतरही विद्यार्थी परतले नाही तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीच ते स्वत: जबाबदार राहतील. स्वाइन फ्लूबाबत विधिमंडळ उपनेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे महत्त्वाची बैठक घेतली. याला प्रभारी उपविभागीय अधिकारी आशिष वानखेडे, प्राचार्य डॉ.डी.डी.लुलेकर, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी हजर होते.