News Flash

यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक पाहिलीत का?

पाहा कसा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ

दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील प्रत्येक राज्यांचे भव्य-दिव्य चित्ररथ हे प्रमुख आकर्षण असते. देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन यामध्ये घडते. वेगवेगळ्या राज्यांचे रथ या प्रदर्शनाचे आकर्षण ठरतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल होणार आहे. अनोख्या अशा या संकल्पनेवर आधारीत या रथाची पहिली झलक समोर आली असून त्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. छोडो भारत या संकल्पनेवर आधारीत रथ तयार करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. यंदा सर्व राज्यांना महात्मा गांधी ही थीम देण्यात आली आहे.

ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून यंदाच्या रथाची निर्मिती झाली आहे. याबाबत देसाई म्हणाले, सर्वांना समान थीम असल्याने आपण कोणता विषय घ्यायचा यासाठी बराच शोध घेण्यात आला. मग ९ ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाची थीम नक्की करण्यात आली. यामध्ये सर्वात उंच अशी १६ फूटी गांधीजींची प्रतिकृती करण्यात आली आहे. ते सभेला संबोधित करत असल्याची ही प्रतिकृती आहे. मुंबईची खासीयत असलेल्या सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या प्रतिकृतीही यामध्ये करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक मोठा चरखाही बनवण्यात आला आहे. त्यातून निघणाऱ्या सुताला तिरंगी रंग देण्यात आला आहे. या  रथाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून महाराष्ट्राची वेगळी कलाकृती त्यानिमित्ताने देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या चित्ररथांचा सराव सध्या दिल्लीमध्ये सुरु आहे. मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा देखावा यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर उभारण्यात आला होता. त्यावेळी प्रजासत्ताक दिनी राजपथावर एकूण २३ चित्ररथांनी सादरीकरण केले. त्यामधील १४ चित्ररथ राज्यांचे होते. तर सरकारी खात्यांच्या ७ चित्ररथांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेकदा पहिला क्रमांक पटकावला होता. यंदा काय होणार याबाबतही उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 7:04 pm

Web Title: tableau of maharashtra rajpath delhi chitrarath republic day 2019
Next Stories
1 प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशावर शिवसेना म्हणते…
2 हा पंकजा मुंडेंच्या ज्ञानाचा दोष; धनंजय मुंडेंचा पलटवार
3 शिवसेनेची अवस्था देताही येत नाही आणि जाताही येत नाही – धनंजय मुंडे
Just Now!
X