ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील मुधोलीलगत एका वाघिणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.  तर कोल्हापूर येथील रूईकर कॉलनीतील एका बंगल्यात बिबटय़ा घुसल्याने त्याला पकडण्याचा खेळ साडे तीन तास रंगला. त्यात एका पोलिसासह तिघे जखमी झाले. थरारनाटय़ानंतर बिबटय़ाला पकडून चांदोली अभय अरण्यात नेले जात वाटेतच तो दगावला. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
मुधोलीतील वन कर्मचाऱ्याला मुख्य रस्त्यालगत वाघीण पडलेली प्रथम दिसली.  तपासणी केली असता एक दिवसापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. दोन वाघांची झुंज, वाहनाची धडक वा विषप्रयोग ही मृत्यूची कारणे सांगण्यात येत आहेत. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी हैदराबाद व बंगळुरू येथे चाचणी होणार आहे.
कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या आवारात बिबटय़ा दिसताच बघ्यांची गर्दी उडाली. त्यामुळे बिथरलेला बिबटय़ा पुढील बंगल्यात शिरला. तेथून तो झुडपात शिरला. वन कर्मचारी व पोलिसांनी जाळे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिथरलेला बिबटा पुन्हा बंगल्यात  एका सोफ्याखाली बसला. नागरिकांनी त्याला काठीने डिवचले. यानंतर तो मोकळ्या जागेत येताच अंगावर जाळी टाकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या नाटय़ात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तीन कॉन्स्टेबल जखमीही झाले.
५० दिवसांत तीन वाघिणींचा मृत्यू
गेल्या ५० दिवसांत तीन पूर्ण वाढ झालेल्या वाघिणींचा मृत्यू झाला आहे. ही वन खात्यासाठी अतिशय दु:खद घटना आहे. १२ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हय़ात वैनगंगा नदीच्या काठावर चामोर्शी येथे एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी ताडोबाचे संरक्षित क्षेत्रात शिवणी येथे एका उघडय़ा विहिरीत वाघिणीचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आज मुधोली येथे वाघीण मृतावस्थेत मिळाली.