विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने करोनाची लस घेतल्यावरून बरंच वादंग निर्माण झालं. त्यावरून फडणवीस यांनाही सवाल करण्यात आले. ४५ वर्षापुढील व्यक्तींच्या गटात बसत नसताना तन्मय फडणवीस याने घेतलेल्या लसीच्या मुद्द्यावरून भाजपालाही लक्ष्य करण्यात आलं. या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

तन्मय फडणवीसने लस घेतल्याच्या प्रकरणात विरोधी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका होत आहे. या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता, तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला करोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसं केलेलं नाही. का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचं आधी बोला,” असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

देशात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणालाच परवानगी देण्यात आलेली असून, देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून महाराष्ट्र काँग्रेससह सोशल मीडियातून भाजपावर टीका झाली.

फडणवीस काय म्हणाले?

“तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” अशी भूमिका फडणवीस यांनी या प्रकरणावर मांडली आहे.