प्रकाश देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

रायगड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रकाश देसाई यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अवघ्या पाच महिन्यात राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रकाश देसाई यांनी पाच महिन्यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली होती. स्थानिक नेत्यांकडून मिळणारया सापत्न वागणूकीला कंटाळून त्यांनी काही दिवसांपुर्वीच प्रदेश चिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. रविवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते राजीव साबळे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्यासह सुधागडपाली तालुक्यातील देसाई यांचे समर्थक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

प्रकाश देसाई यांनी यापुर्वी शिवसेनेत त्यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी संभाळली होती. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदार संघांत पक्षसंघटना बांधणी आणि मजबुत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यात त्यांना चांगले यशही मिळाले होते. मुरुड नगरपालिका निवडणूकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. तर जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीतही अलिबाग, मुरुड, सुधागड पाली तालुक्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. पण नंतर मात्र जिल्ह्य़ात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे अनेक औद्योगिक प्रकल्प असूनही शिवसनिक मात्र उपेक्षीत राहतो आहे. अशा परीस्थितीत जिल्हाप्रमुख म्हणून काम करणे प्रशस्त वाटत नसल्याचे म्हणत त्यांनी आपला राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सादर करत, राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण अवघ्या साडेपाच महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सुनील तटकरे यांच्या अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.

‘ स्थानिक नेत्यांकडून मला सातत्याने सापत्न वागणूक दिली जात होती. पक्षांतर्गत निर्णय प्रक्रीयेपासून दूर ठेवले जात होते. याबाबत पक्षनेतृत्वाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.’

–    प्रकाश देसाई, राष्ट्रवादीचे नेते.