पालघर : वाडा तालुक्यातील आंबिवली येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा प्रश्न अधांतरी राहिल्याने या शाळेतील १४ शिक्षक- कर्मचारी गेले तीन महिने वेतनापासून वंचित आहेत.  मुख्याध्यापक पदाचा रितसर प्रस्ताव वारंवार पाठवल्यानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांनी तो  मान्य न केल्यामुळे संतप्त शिक्षक-कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

नेहरोली परिसर शिक्षण मंडळाच्या सुरेखा एच गार्डी स्वजन विद्यालय,  आंबिवली या विद्यालयाचे मुख्याध्यापक  पदावरून वाद सुरू आहे.  या विद्यालयात ३१ जुलै २०२० रोजी शाळेचे पी.एम. देशमुख हे मुख्याध्यापक  सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार रवींद्र पालवे यांची पदोन्नती शिक्षण संस्थेने केली होती.  मात्र त्यावेळी सेवाजेष्ठतावरून या शाळेच्या एका शिक्षकाने आक्षेप घेतला आहे.  सप्टेंबरमध्ये या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. मात्र त्याचा निकाल सुमारे तीन महिने प्रलंबित ठेवला, असे आरोप संस्थेने केले आहेत.  शिक्षणाधिकारी यांनी सूनवणीचा निकाल न दिल्यास संस्थेमार्फत  उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला होता.  या इशाऱ्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी  लगेच १२ जानेवारी रोजी सुनावणी चा निकाल देऊन त्यात पालवे हेच सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी पात्र आहेत असा निकाल दिला. पुढे पालवे यांना अधिकृतरित्या सेवेत रूजू होण्यासाठीची प्रक्रिया न केली गेली नाही. याबाबतचा  प्रस्ताव २५ जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दिला होता.

परंतु हा प्रस्ताव जाणूनबुजून रखडवला जात आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.  या लाक्षणिक उपोषणास शिक्षण सभापती  निलेश सांबरे यांच्यासह विविध संघटनांनीही या लाक्षणिक उपोषणला पाठिंबा दिला आहे.

मागासवर्गीय व्यक्तीला अशाप्रकारे मनस्ताप देत असल्याबद्दल   मुख्याध्यापक रवींद्र पालवे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेमार्फत शिक्षण अधिकारी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी  शासनाकडे केली आहे. शिंक्षणाधिकारी यांना याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता त्या पुणे येथे कामानिमित्त गेल्याचे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही.