विविध तपासणी यंत्रणेचा प्राथमिक अंदाज

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यासह अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षातील (एसएनसीयू) आग लागल्याचे कर्मचाऱ्यांना कळल्याच्या ३० ते ४५ मिनिटांपूर्वी लागली होती, असा प्राथमिक अंदाज विविध विद्युतशी संबंधित तपास यंत्रणांचा आहे. त्यामुळे एवढा वेळ येथे सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही? असा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे. या वृत्ताला नाव न टाकण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

रुग्णालयातील एसएनसीयू कक्षातील विद्युत यंत्रणेला आग कशी लागली याची पाहणी करण्यासाठी रविवारी विद्युत निरीक्षकांची चमू रुग्णालयातील घटनास्थळी गेली. येथे विद्युत पुरवठा बंद असल्याने अंधार असल्याने त्यांनी प्रथम मोबाईल टॉर्च व इतर साहित्यांच्या मदतीने येथील काही तारांचे निरीक्षण केले. संपूर्ण खोली आगीसह धुरामुळे काळी पडली असल्याने त्यांना तारांचे निरीक्षण करताना त्रास होत होता. त्यातच येथे वेळोवेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे निरीक्षणासह इतरही समित्यांकडून वेळोवेळी पाहणी सुरू असल्याने सोमवारी त्यांचे काम अर्धवटच राहिले. त्यामुळे त्यांनी येथील काही कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे म्हणणे नोंदवले. ते सोमवारी पुन्हा निरीक्षणाला जाणार आहे.

दरम्यान, न्यायवैद्यक विभागाकडूनही येथील इलेक्ट्रिक बोर्डासह इतरही काही विद्युतशी संबंधित साहित्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. या सर्व साहित्यांचे सुक्ष्म निरीक्षणकरून अचूक अहवाल यायला आणखी बराच कालावधी लागणार आहे. परंतु प्रथमदर्शनी येथील आग लागल्यावर सुमारे ३० ते ४० मिनिटानंतरच परिचारिकेला ते कळले असावे, असा अंदाज विद्युतशी संबंधित येथे तपासणी करणाऱ्या विविध यंत्रणेला आहे. परंतु विविध दिशेने तपासणी व विविध साहित्यांच्या तपासणीच्या अहवालानंतरच अचूक गोष्टी कळण्याचा अंदाज नाव न टाकण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वातानुकूलित यंत्रामुळे आग उग्र झाली!

‘एसएनसीयू’तील आग मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तीन जळालेल्या नवजात बाळांच्या जवळच्या विद्युत उपकरणाला लागली. आगीत वायर जळल्याने येथील एक वातानुकूलित यंत्र बंद पडले, परंतु इतर वातानुकूलित यंत्र काही वेळ सुरू राहिले. त्यामुळे आग उग्र होण्यासह त्याचा धूर येथील बंद खोलीत जमा झाल्याचेही प्राथमिक माहिती पुढे येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.