प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात दहा निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला. याप्रकरणी अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज(सोमवार) भंडारा बंद पाळण्यात येत आहे. असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

भंडरा जिल्हा रुग्णालयातील घटनेबाबत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारकडे यावेळी मागण्या देखील केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपये देण्यात यावे आणि भंडारा सामान्य रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी राज्य सरकारने तत्काळ आराखड्याला मंजुरी द्यावी, यासुद्धा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारने तत्काळ या तिन्ही मागण्या मान्य कराव्या, ही आमची मागणी आहे. असं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी जनेतेमधूनही होत आहे. कारण, एखादा जर अपघात असेल, तर त्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होत नाही. पण, जाणीवपूर्वक कुठल्यातरी प्रकारे जी कारवाई करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे काही लोकांनी आपलं कर्तव्य पार न पाडल्यामुळे, जर एखादी घटना घडली असेल तर तो सदोष मनुष्यवधच आहे. म्हणून तशाप्रकारे कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी आहे. असं देखील फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवलं.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे.