नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कोहिनुर प्रकरणी नोटीस पाठवली होती. याच कारणामुळे कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने आत्महत्या केल्याचे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो. या प्रकरणी पोलीस तपास करत असून पोलिसांनी मात्र अद्याप आत्महत्येचे कारण अधिकृतरीत्या सांगितलेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे आपण दुखावलो आहोत. त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मेसेज त्यानं आत्महत्येपूर्वी केला होता, असे सांगण्यात आले आहे. तसेच या मेसेजनंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचे समजते. दरम्यान, कळव्यातील शिवाजी रूग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रविण हा राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता. तसेच तो अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जात होता. त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.