05 March 2021

News Flash

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप; MPSC च्या तीन पदांवरती निवड

पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षेचा केला कसून अभ्यास

चंद्रपूर : सुरेंद्र बुटले या तरुणाने राज्य लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण केल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील सुरेंद्र मनोहर बुटले या ध्येयवेड्या तरुणाने एकाच आठवड्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन पदांच्या परीक्षांमध्ये यश मिळवत मोठी गरुडझेप घेतली आहे. सुरेंद्रने मिळवलेल्या यशाला मोठी झळाळी आहे. कारण त्याचे आई-वडील अशिक्षित असून अल्पभूधारक शेतकरी आहेत.

सुरेंद्र मनोहर बुटले (मु. पो. तोहागाव, ता. गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून एकाच आठवड्यात आलेल्या एमपीएससीच्या परीक्षांच्या निकालामध्ये राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (ओबीसी, रँक २), कर सहाय्यक (ओबीसी, रँक ४) आणि मंत्रालय लिपीक (राज्यात दुसरा) अशा तीन पदांसाठी त्याची निवड झाली आहे. सुरेंद्रचे प्राथमिक शिक्षण हे तोहगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण याच गावातील किसान विद्यालय येथून पूर्ण झाले. त्यानंतर चंद्रपूर येथील भवानजीभाई विद्यालयातून त्याने ज्युनियर कॉलेज तर पुढे चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयातून बीईची पदवी घेतली आहे. त्यानंतर सन २०१५ पासून सुरेंद्रने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यामधील स्पर्धा परीक्षा केंद्रामधून राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास सुरू केला.

अनेकवेळा अपयशाला सामोरं जाऊनही खचून न जाता जिद्द आणि चिकाटी यामुळे त्याने अधिक जोमाने अथक परिश्रम घेतले व आज हे यश संपादन केले. खरंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून येऊन विद्येच्या माहेरघरामध्ये त्याने बाळगलेली महत्वाकांक्षा आणि त्यातून मिळवलेलं यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

आई-वडील अशिक्षित, मोठा भाऊ वनरक्षक

सुरेंद्रच्या आई (शोभाताई बुटले) आणि वडील (मनोहर बुटले) हे अशिक्षित असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. कौटुंबिक परिस्थिती गरीब व हलाखीची असताना सुद्धा वडिलांनी मजुरी करून सुरेंद्र आणि त्याच्या मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण केले. सुरेंद्रचे मोठे बंधू नरेंद्र हे सुद्धा वनरक्षक आणि नंतर MSWC भांडारपाल या पदावरती चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. या यशाच्या शिखरावरती मागे वळून पाहताना आई, वडील यांनी जीवनामध्ये केलेला संघर्ष व गरीब परिस्थितीतही आम्हा भावंडांवरती केलेले संस्कार यामुळेच आम्ही इथपर्यंत यश संपादन करू शकल्याची भावना यावेळी सुरेंद्रने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 11:55 am

Web Title: the big achievement of the son of a minority farmer selection for three posts of mpsc in a week aau 85
Next Stories
1 “शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय”
2 “भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा”; उदय सामंत यांचं केंद्राला आवाहन
3 …म्हणून राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रं पाठवणार
Just Now!
X