भारतीय शरीरसौष्ठवांचा कुंभमेळा अर्थातच अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा पुण्यात होणार असून या स्पर्धेसाठी देशभरातील ६०० बॉडी बिल्डर पुण्याकडे रवाना झाले आहेत. येत्या २३ ते २५ मार्च या काळात ही स्पर्धा बालेवाडीतील शिवछत्रपती क्रिडा संकुलात होणार आहे. या स्पर्धेसाठी ५० लाखांची रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा ऐतिहासिक, अद्वितीय आणि ग्लॅमरस स्वरुपात होणार असल्याचा विश्वास इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील ४१ राज्यांमधील तब्बल ६०० खेळाडू या स्पर्धेमध्ये आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणार आहेत. काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला हा खेळ आता खऱ्या अर्थाने बलशाली झाला आहे. ६०० पैकी सुमारे ४०० खेळाडू मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळणार आहेत. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असणार आहे. तसेच फिजिक स्पोर्टस् प्रकारातही खेळाडूंची संख्या मोठी असेल.

या स्पर्धेत महाराष्ट्र, रेल्वे, सेनादल, पंजाब, उत्तर प्रदेश, तामीळनाडूसारख्या तगड्या संघांचे स्टार खेळाडू सहभागी होत आहेत. रामनिवास, यतिंदर सिंग, जावेद खानसारखे दिग्गज या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. त्यामुळे सलग दोनवेळा भारत श्रीचा मान मिळविणाऱ्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखणे फार आव्हानात्मक असणार आहे.

चेतन पाठारे यांच्या नेतृत्वाखाली आयबीबीएफने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ठाण्याचे प्रशांत आपटे आणि मुंबईचे अजय खानविलकर यांनी भारत श्रीसाठी आपली आर्थिक ताकद आयबीबीएफच्या मागे उभी केली आहे. एवढेच नव्हे तर यांचे सहकार्य पाहून शरीरसौष्ठवाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही स्पर्धेच्या ऐतिहासिक आयोजनासाठी आर्थिक बळ दिल्याची माहिती पाठारे यांनी दिली.