कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याची वस्तूस्थिती लक्षात घ्यावी. विद्यापीठ पळविले वगरे असा दुष्प्रचार करु नका. आपण धुळ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशासाठी काम करत आहोत. ठरविले तर विद्यापीठ जळगांवलाही नेऊ शकतो. परंतु अविकसीत भागाला विकसीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे आश्वासन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिले.
सर्वपक्षीय कृषी विद्यापीठ समितीच्या वतीने रविवारी धुळे दौऱ्यावर आलेल्या खडसे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी खडसे यांनी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना उद्देशुन बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. आपल्यामुळे आता खान्देशचा राज्य पातळीवर उल्लेख होऊ लागला आहे. राज्यातील अविकसीत भागांमध्ये विकासाचे काम आम्ही सुरू केले आहे. मागच्यावेळी आपण मंत्री असताना धुळे जिल्ह्यात तीन बॅरेज मंजूर करुन पूर्ण केले. नंदुरबार जिल्हा वेगळा केला. आता तालुक्यांच्या सोयीसाठी नवीन तहसील कार्यालये केली. भेदभाव करण्याचा प्रकार आपणास जमत नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. कृषी विद्यापीठ पळवून नेल्याचा दुष्प्रचार करु नका. विद्यापीठासाठी आवश्यक शेतजमीन उपलब्ध होणे आवश्यक आहे. जळगांव जिल्ह्यात एवढी शेतजमीन उपलब्ध नाही. धुळे जिल्ह्यात जर कृषी विद्यापीठासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून मिळाली तर येथे देखील कृषी विद्यापीठ होऊ शकते. त्यामुळे जेव्हा निर्णय होईल त्यावेळी सर्वसहमतीनेच कृषी विद्यापीठ स्थापन केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी शरद पाटील यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते.