प्रशांत देशमुख

जंगल परिसरातील एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या प्रफुल मेश्राम या ध्येयवेड्या युवकाने प्रचंड अडचणीवर मात करून संशोधनासाठी आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या मानव्यशास्त्रात पीएचडी पदवी प्राप्त करीत यशाचे नवे शिखर गाठले आहे.

पीएचडी ही पदवी आता फारशी नवलाईची समजली जात नाही. उलट ही पदवी मिळविण्याच्या नाना खटपटीच अधिक चर्चिल्या जात असल्याने या पदवीचे कौतुकही फारसे होत नाही. या पार्श्वभूमीवर प्रफुल भगवान मेश्राम याने घेतलेली झेप मात्र वेगळ्या कारणाने कौतुकास्पद ठरली आहे. सेलू तालूक्यातील हिस्त्र पशूंचा वावर असणाऱ्या जंगलातील वडगाव जंगली या गावचा रहिवासी असणाऱ्या प्रफुलचे सुमित्रा व भगवान मेश्राम हे आईवडील लगतच्याच आदिवासी आश्रमशाळेत स्वयंपाकी व मोलमजूरी करतात. घरातील सर्वात धकट्या असणाऱ्या प्रफुलने गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत तालुकास्थळी असणाऱ्या यशवंत महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात पदव्युत्तर शिक्षण त्याने पूर्ण केले. संशोधनाची आवड असल्याने वेगळ्या वाटेने जाण्याचे त्याने ठरविले.

समाजशास्त्रात काही विषय अद्याप आव्हानात्मक समजले जातात. त्यात मानव्यशास्त्रातील भाषाशास्त्र हा असाच अवघड व व्याकरण आधारित विषय आहे. त्याची निवड करीत प्रफुलने पदवीसाठी नोंदणी केली. त्याची विषय निवड पाहून विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याला राजीव गांधी राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती मंजूर केली. या शिष्यवृत्तीतून पुस्तके विकत घेणे, प्रवास व अनुषंगिक शैक्षणिक खर्च करतांनाच त्याने काही बचतही केली. बचतीच्या या पैशातून लहान भावाला किराणा दुकान थाटून दिले. एवढेच नव्हे तर मोठ्या भावाचे व बहिणीच्या लग्नकार्यासही हातभार लावला. घरच्या प्रपंचात आईवडिलांना शक्य ती मदत करणाऱ्या प्रफुलने अवघड विषयातील संशोधनही सुरूच ठेवले.

हिंदी व मराठी भाषेतील म्हणींचा तुलनात्मक अभ्यास व क्रिया पदबंध असा व्याकरणपूर्ण शोधप्रबंध विद्यापीठाने मंजूर केला आहे. डॉ. अनिलकुमार दुबे व अनिलकुमार पांडे या गुरूवर्याचे त्याला मार्गदर्शन लाभले. मुळातच भाषाशास्त्रात संशोधन करणारे देशभरात मोजके अभ्यासू असल्याने प्रफुलचे यश या क्षेत्रात लक्षणीय ठरते, अशी प्रतिक्रिया त्याला शिकविणारे प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सध्या डॉ. प्रफुल मेश्राम पुणे येथील डेक्कन कॉलेज या पदव्युत्तर संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. या संस्थेच्या ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण‑प्रतिमांकन आणि आलेखन’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे समन्वयक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहे.