महात्मा गांधी मिशन (एमजीएम) महाविद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थिनी आकांक्षा देशमुखच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करून प्रकरण न्यायालयात दाखल करावे अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यात चर्चा झाली.
मूळची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी असलेली आकांक्षा देशमुख औरंगाबादमध्ये एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होती.

दि १० डिसेंबर २०१८ च्या रात्री चोरीच्या उद्देशाने आकांक्षाच्या वसतिगृहातील खोलीत शिरलेल्या राहुल शर्मा या आरोपीने आकांक्षाचा विरोध वाढल्याने तिचा तोंड व गळा दाबून खून केला. त्यानंतर ७ दिवसांत पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून आरोपीला अटक केली.  या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि प्रकरण न्यायालयात दाखल करावे अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याशी झालेल्या चर्चेत केली आहे.