मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा असंवैधानिक असल्याचं  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं म्हटलं होतं. यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज ठाकरे यांनी गोळ्या घालण्याची केलेली असंवैधानिक भाषा त्यांच्या सारख्या जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचे आम्ही समर्थन करत नाही. त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्या तर पाकिस्तानमधील अतिरेक्यांना घाला.” असं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल…नोटांना थुंका लावत आहेत…भाज्यांवर थुंकत आहेत. या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल व्हायला हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.

या अगोदर गो करोना, करोना गो! या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चर्चेत आले होते. त्यानंतर त त्यांनी ‘नो करोना, नो करोना! ही नवी घोषणा दिली होती. करोनाच्या संकटाबाबत रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ही नवी घोषणा दिली होती. गो करोना, नो करोना असंही आठवले यावेळी म्हणाले. तसेच मी सगळा वेळ घरातच घालवत आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं.