सप्ताहांच्या राजकीयीकरणाने भाविकांमध्ये नाराजी

अखंड हरिनामाचा सप्ताह तसा किती वर्षे जुना?-वारकरी संप्रदायातील जाणकार कदाचित कालखंड सांगतीलसुद्धा! पण आता सप्ताहाचे रंगरूप बदलू लागले आहे. बदल हळूहळू एवढे होत गेले की, नारळी सप्ताहात टाळकऱ्यांचेसुद्धा कंत्राट द्यावे लागते. कीर्तनकारांची बिदागी वेगळी. ध्वनिक्षेपक व मंडपाचा खर्च निराळा. सर्वाधिक खर्च होतो तो जेवणावळीवर. येणाऱ्या भाविकांना भोजनासाठी करावा लागणारा खर्च लाखोंच्या घरात आहे. हा ज्या गावांना परवडतो त्या गावात सप्ताह. किती गंभीरपणे होते या सप्ताहाचे आयोजन?- भगवानगडाचा दरवर्षी होणारा सप्ताह कोणत्या गावी व्हावा, हे ठरविले जाते. अलीकडेच २०३६ पर्यंतचे सप्ताह कोणत्या गावात घ्यायचे, याचे नियोजन ठरलेले आहे. केवळ एवढेच नाही, या बदलत्या स्वरूपात राजकीय नेत्यांचा वावर सध्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.

बीड जिल्ह्यात भगवानगडाचा या वर्षीचा नारळी सप्ताह तागडगाव येथे नुकताच घेण्यात आला. गहिनीनाथगडाचा सप्ताह शिरुर तालुक्यातील उकिर्डा चकला (ता. शिरुर) येथे तर नारायणगडाचा सप्ताह सौंदाना (ता. बीड) येथे झाला. ही गावे तशी आकारमानाने लहान. लोकसंख्याही कमी. पण गावातून माणसी ५०० रुपयांपर्यंत पट्टी गोळा केली जाते. तसे करायचे नसेल तर एकरी हजार रुपये असा नियम. गावकरी मोठय़ा आनंदाने ही रक्कम जमवितात. सारा खर्च ठरतो. अगदीच गरज भासली तर गावाचा पुढारी, नोकरदार जरा जास्तीची रक्कम देतात. सप्ताह मोठय़ा थाटात होतो.

संत बंकटस्वामी, नगदनारायण, भगवानबाबा, वामनभाऊ यांनी अध्यात्माच्या प्रसारासाठी धार्मिक गडांची स्थापना करून नारळी सप्ताहांची परंपरा सुरू केली. गर्दी वाढत गेली. मात्र, अलीकडच्या काळात सप्ताहांमध्ये वाढलेल्या गर्दीवर प्रभाव टाकण्याचा मोह राजकारण्यांना झाल्याने धार्मिक सप्ताहांचे राजकीयीकरण होऊ लागले आहे. त्यातून आध्यात्मिक गड आणि महंतांना जाती जातीत विभागले जाऊन असल्याने गडावरील सार्वजनिक कार्यक्रमापासून गावातील नारळी सप्ताहापर्यंत कीर्तनकारांऐवजी राजकारण्यांचाच वावर अधिक झाला. पूर्वी गावाच्या श्रमदानातून साधेपणाने होणाऱ्या सप्ताहांनी आता कोटींची उड्डाणे सुरू केली आहेत. गावात शाळा, दवाखाना, पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत सुविधांची आबाळ असते. नारळी सप्ताहासाठी मात्र कोटय़वधी रुपयांची वर्गणी जमा होते आणि गावातील लाखभर रुपयांच्या सार्वजनिक कामासाठी मात्र गावचे कारभारी पुढाऱ्यांच्या दारामध्ये वर्षांनुवर्ष खेटे मारतात, असे विरोधाभासी चित्र दिसून येते.

राजकीय नेत्यांचा वाढता वावर

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी तीन वर्षांपूर्वी गडावरून राजकीय भाषणबंदीचा निर्णय घेतल्यानंतर महंत व मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद राज्याने अनुभवला. या पाश्र्वभूमीवर भगवानगडाच्या नारळी सप्ताहामध्येही तीन वर्षे भाषणबंदी राहिली. मात्र, तागडगाव येथे या वर्षी महंत शास्त्री यांनीच गड भाषणमुक्त झाल्याचे सांगून नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणाला परवानगी दिली. शुभारंभाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले यांच्यासह सात दिवस जिल्हाभरातील विविध पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांची ‘सप्ताह भेट’ सुरू राहिली. तर समारोपाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची रथातून मिरवणूक काढून सप्ताहाच्या व्यासपीठावर आणले. धार्मिक सप्ताहात कीर्तनकारांऐवजी राजकीय नेतृत्वाची मिरवणूक काढण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. महंत शास्त्री व मंत्री मुंडे यांच्यातील वादाच्या पाश्र्वभूमीवर दोघे एका व्यासपीठावर आल्याने काय बोलतात याची उत्सुकताच सर्वाना होती. सप्ताहात कीर्तनकार, प्रवचनकारांपेक्षा राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणालाच महत्त्व आले.

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सौंदाणातील नारळी सप्ताहाच्या समारोपातही मंत्री मुंडे, आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या सप्ताहातही मेटे-क्षीरसागरांच्या राजकीय भाषणबाजीच लक्षवेधी ठरली. दुसरीकडे गहिनीनाथ गडाच्या उकिर्डा चकला येथील नारळी सप्ताहातही राजकीय नेत्यांची उपस्थिती कमी नव्हती. महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत समारोपाला माजी राज्यमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे, प्रताप ढाकणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी हजेरी लावून भाषणबाजी केली. त्यामुळे सप्ताहांना कोणता राजकीय नेता येणार आणि काय बोलणार,याचीच उत्सुकता अधिक असते. सप्ताहाच्या गावातील नेत्यांचे समर्थक नेत्याला सप्ताहात आणून भाविकांसमोर व्यक्त करायला लावण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे नेत्यांनाही सप्ताहांना सढळ हाताने मदत करावी लागते. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सप्ताहांच्या पट्टीबाबत केलेले वक्तव्य तसे जळजळीत सत्य सांगणारे आहे.

सध्या बीड जिल्हय़ात तीन मोठे सप्ताह सुरू आहेत. मग कोणाची किती पट्टी फाडायची, यावरून अडचणच होते. आपण एक आकडा टाकावा आणि विरोधकांनी त्यावर रुपया वाढवून द्यावा अशी स्थिती आहे.       – जयदत्त क्षीरसागर, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>