मराठा आरक्षण निकालावर आ. रोहित पवार यांची सूचना

नगर : मराठा समाजाच्या युवकांच्या नोकरी व शिक्षणाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यासाठी आता राज्य सरकार व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून, युवकांना फायदा कसा देता येईल याचा निर्णय घ्यावा. या विषयात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केले.

आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या वतीने हवा व पाणी याद्वारे प्राणवायू निर्मिती करणारी ३९ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आली. जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये झालेल्या या कार्यक्रमात आ. संग्राम जगताप व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याचा स्वीकार केला. या वेळी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे व कपिल पवार आदी या वेळी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी मराठा आरक्षणा संदर्भात दिलेल्या निकालावर भाष्य करताना वरील आवाहन केले.

आ. पवार म्हणाले,की सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय व कसा दिला याचा मी अद्याप अभ्यास केलेला नाही. परंतु ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. अनेकांना या निकालाबद्दल अपेक्षा होती. त्यामुळे त्यांना त्याचे वाईट वाटत असेल. आरक्षण मिळाले असते तर युवकांना फायदा झाला असता. आता राज्य सरकार व विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र बसून समाजातील युवक वर्गाच्या दृष्टीने वेगळा हिताचा निर्णय कसा देता येईल, याचा विचार करावा. यात कोणीही राजकारण करू नये. या आरक्षणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जे वकील मागील सरकारने दिले होते तेच सध्याच्या सरकारने कायम ठेवले होते. त्यांचा युक्तिवादही योग्य पद्धतीने झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

आता सरकारच्या हाती ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र बसून शिक्षण व नोकरीमध्ये युवकांना कसा फायदा देता येईल, याचा विचार करावा अशीही सूचना आ. पवार यांनी केली.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ३९ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रे सुपूर्त करण्यात आली. आ. संग्राम जगताप व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याचा स्वीकार केला.