करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यात बोडणी येथे तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य तपासणी पथकांना ग्रामस्थांनी हाकलून लावल्याची घटना आज घडली. एवढेच नाहीतर तपासणीसाठी सहकार्य करण्याची विनंती देखील ग्रामस्थांनी धुडकावून लावली. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना येथील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या चार दिवसात करोनाचे ७२ रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात प्रशासनाने आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मात्र ग्रामस्थांकडून आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला जात आहे. उलट तपासणीसाठी गावात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्यास ग्रामस्थांनी सुरवात केली. त्यामुळे अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, मांडवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी तिथे गेले. मात्र, खोटे रिपोर्ट देऊन ग्रामस्थांना करोनाबाधित ठरवले जात असल्याचा दावा या ग्रामस्थांनी केला. तसेच, आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला.

गावातील शेकडो नागरीक यावेळी रस्त्यावर उतरले होते. यात करोनाबाधित रुग्णांचाही समावेश होता. हे सर्वजण अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांनाही या बोडणीकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर ग्रामस्थांच्या रोषापुढे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणांनी गावातून काढता पाय घेतला. दरम्यान गृह विलगीकरणात असलेले करोनाबाधित गावात फिरत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.

ग्रामस्थांकडून तपासणीसाठी सहकार्य नाही –
गावात चार दिवसात जवळपास ७२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावात व्यापक तपासणी मोहिम सुरु केली आहे. पण गावातील लोकांकडून या तपासणीसाठी सहकार्य केल्या जात नाही. त्यामुळे महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी मिळून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकले नाही. उलट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. असे  अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.