पुण्यातील झील एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक राजेश काटकर यांच्या पत्नी स्नेहल जगताप यांनी दबाव टाकत त्यांचे एमईचे सर्व पेपर आपल्याकडून सोडवून घेतल्याचा सनसनाटी आरोप याच संस्थेतील प्राध्यापक अनुराग जैन यांनी केला आहे. एका प्रतिज्ञापत्रावर याबाबतची तक्रार त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे दाखल केली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात ही घटना घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील नऱ्हे-आंबेगाव येथील झील एज्युकेशन अभियांत्रिकेचे संचालक राजेश काटकर यांच्या पत्नी स्नेहल या २०१७-१८ या वर्षात एमईच्या परीक्षेसाठी बसल्या होत्या. या परिक्षेसाठीचे सर्व पेपर स्नेहल जगताप यांनी परिक्षा हॉलमध्ये बसून लिहीले नाहीत. तर स्नेहल आणि त्यांचे संचालक पती राजेश काटकर आणि संस्थेतील इतर काही जणांनी माझ्यावर दबाव टाकत पाच विषयाचे पेपर सोडवून घेतले, अशी तक्रार अनुराग जैन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडे केली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून मला माफीचा साक्षीदार करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना राजेश काटकर म्हणाले, आमच्या संस्थेमधून अनुराग जैन यांना यापूर्वीच काढून टाकण्यात आल्याने त्यांनी असे आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांविरोधात आम्ही लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. त्याचबरोबर विद्यापीठामार्फत १३ तारखेला चौकशी होईल आणि त्यातून सत्य परिस्थिती समोर येईल.