प्रदीप नणंदकर

कमी भावात शेतमाल विकण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की

दिवसेंदिवस दुष्काळाची पडछाया गडद होत असल्यामुळे ऐन दिवाळीत धान्य बाजारपेठेतही मंदीची लाट आली आहे.

दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रचंड धामधूम असते. सप्टेंबर महिन्यापासून पाऊस रुसलेला असल्यामुळे बाजारपेठेवर त्याचे परिणाम सुरू झाले. कमी पावसामुळे खरिपाच्या हंगामातील उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला. सोयाबीनच्या उताऱ्यात घट झाली. तुरीचे केवळ खराटेच शिल्लक राहिले. कारण फुलोऱ्यात येण्यापूर्वीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे तुरीची फुलगळ झाली. सात बहार येण्याची संधी असणाऱ्या तुरीला पाणीच मिळाले नसल्यामुळे एकही बहार फुलू शकला नाही. खरीप हातचे गेले. पाऊसच नसल्यामुळे रब्बीवर त्याचा मोठा परिणाम झाला. जिल्हय़ात १ लाख ९५ हजार हेक्टर इतके रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. पकी २३ हजार २६० हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. त्यात प्रामुख्याने हरभऱ्याचा पेरा झाला. अपेक्षित सरासरीच्या केवळ १२ टक्के इतकी नीचांकी पेरणी झाली.

गेली दोन वष्रे दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत फिरणेही अशक्य इतकी विक्रमी रोज ४० ते ५० हजार क्विंटल इतकी सोयाबीनची आवक असायची. या वर्षी ती केवळ १५ ते २० हजार क्विंटल इतकी खाली आली आहे. मूग व उडदाची आवक एक हजार क्विंटलच्या आसपासच आहे. सणासुदीच्या खर्चासाठी सोयाबीन विक्री हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. सोयाबीनचा हमीभाव ३३९९ रुपये आहे व बाजारपेठेत ३२५० इतका भाव आहे. तो कमी जरी असला तरी खर्चासाठी पसे हवे असल्यामुळे लोक सोयाबीन विकायला आणत आहेत. मूग व उडदाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नाहीत. शासकीय कामातील लालफितीमुळे शेतकरी वैतागला असल्यामुळे खरेदी केंद्रांना फारसा प्रतिसादही मिळत नाही.

या वर्षी सोयाबीनचे भाव कमी होणार नाहीत. मध्य प्रदेश, राजस्थान या प्रांतातील सोयाबीनचे उत्पादन चांगले आहे. गतवर्षी देशातील उत्पादन ८४ लाख टन होते. या वर्षी ते १०० लाख टनांपेक्षा अधिकचे आहे, मात्र तरीदेखील बाजारपेठेतील भाव वाढण्याचे संकेत आहेत. केंद्र शासनाने आयातीवर लावलेले र्निबध व पामतेलासाठी आकारला जाणारा कर यामुळे भाव पडले नाहीत. शिवाय चीनला सोयाबीनची पेंड निर्यात होण्याच्या आशा पल्लवीत झाल्यामुळे भाव वाढतील या आशेने बाजारपेठेतील वातावरण चांगले आहे.

तुरीच्या उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट होईल. कर्नाटक व आंध्र प्रांतातही पाऊस बेताचा असल्याने तेथील उत्पादनही या वर्षी घटणार आहे. राज्य शासनाने गतवर्षी हमीभावात खरेदी केलेली तूर बाजारपेठेत विकणे सुरू केले आहे. तुरीच्या उत्पादनातील घट लक्षात घेऊन शासनाची हमीभावात खरेदी केलेली तूर सध्या गोदाम रिकामे करण्यासाठी शासन दीड हजार रुपये प्रतिक्विंटल कमी दराने विकते आहे व ही तूर मोठे व्यापारी खरेदी करून ती साठवून पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारनेच तुरीच्या उत्पादनाचा अंदाज घेऊन तूर विक्रीचा निर्णय घ्यायला हवा. अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यासंबंधी गंभीरपणे विचार करण्याची गरज लातूर येथील डाळीचे प्रथितयश व्यापारी नितीन कलंत्री यांनी व्यक्त केली.

हरभऱ्याचा पेराही लातूर परिसरात कमी असला तरी मध्य प्रदेश, राजस्थानात तो चांगला आहे व गतवर्षी खरेदी केलेला हरभरा शासनाकडे शिल्लक आहे. हरभरा बाजारपेठेत विकण्यापूर्वीदेखील शासनाने भविष्यातील गरज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने विकण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.

बेरोजगारीचे सावट

दिवाळीच्या निमित्ताने पुढील वर्षांचे नियोजन बाजारपेठेत होते. या वर्षी बाजारपेठेतील दुकानाच्या भाडय़ात एकही रुपया वाढ झालेली नाही. मुनिमांचे पगारही वाढवण्यात आलेले नाहीत. याउलट व्यवसाय कमी होणार असल्यामुळे मुनिमांच्या नोकरीवर गंडांतर येत आहे. लातूर बाजारपेठेत चारशे आडत व्यापारी व सुमारे सव्वाशे खरेदीदार आहेत. दोन हजार मुनीम काम करतात. किमान  ४०० मुनिमांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. हमालांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. दिवाळीनंतर बाजारपेठेत येणारी आवक मंदावणार असल्यामुळे हातावर पोट असलेल्या हमालांची मोठी अडचण होणार आहे. दालमिल उद्योग ही लातूरची मोठी ओळख आहे. ८०च्या आसपास एकूण दालमिल आहेत. या वर्षी तूर व हरभरा उत्पादनावर परिणाम होणार असल्यामुळे जेमतेम दोन महिनेच दालमिल चालतील. शिवाय पाण्याचे संकट असल्यामुळेही दालमिल चालवणे अवघड होणार आहे. त्यामुळे हजारो जणांना रोजगार गमवावा लागणार आहे.