राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. त्यासाठी बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. मात्र, अद्याप उद्यापर्यंत ही चर्चा सुरु राहिल त्यानंतरच राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळण्याबाबत अंतिम निर्णय होईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, “गेल्या २१ दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेली अस्थिरता संपवण्याकरीता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा अंतिम टप्प्यात असूून अजूनही काही गोष्टींवर चर्चा बाकी आहे. त्यामुळे उद्यापर्यंत ही चर्चा अशीच सुरु राहील. मला आशा आहे की राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल आणि पर्यायी सरकार अस्तित्वात येईल.”

समान कार्यक्रमावर सध्या चर्चा सुरु असून तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात पर्यायी सरकार देऊ, असे यावेळी नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, शिवसेनेशी पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे यावेळी आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.