जिल्ह्य़ातील पाणी योजनांची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे. ही चौकशी पुणे व औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमार्फत करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पाणीपुरवठा मंत्रालयाला पाठवला आहे. त्याला येत्या आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी आलेल्या जिल्ह्य़ातील १५ गावांच्या वैयक्तिक पाणी योजनांची नवाल यांच्या सूचनेनुसार पथके स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत होणा-या कामांची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे, त्यापाठोपाठ आता पाणी योजनांचीही चौकशी अशाच प्रकारे केली जाणार आहे. गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठय़ासाठी गेल्या काही वर्षांत विविध योजना राबवण्यात आल्या. त्यासाठी निधीही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करण्यात आला. या योजनांची कामे प्रामुख्याने ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली. त्याच्या देखभालीची जबाबदारीही गावाच्या पाणीपुरवठा समितीकडेच असते. मात्र अनेक ठिकाणी कामे निकृष्ट झाल्याच्या, पाणी मिळत नसल्याच्या, परिसरातील वाडय़ा-वस्त्या वंचित राहील्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीचे किंवा समितीचे पदाधिकारी बदलले की या तक्रारी होत असतात.
त्रयस्थ यंत्रणा केवळ योजनांची चौकशीच करणार आहे असे नाहीतर, योजनांमध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, हेही सुचवणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच गावांच्या समितीनेही कशा पद्धतीने काम करावे, देखभाल व दुरुस्ती याचीही माहिती देणार आहे. प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० टक्के योजनांची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी पुणे किंवा औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत व्हावी, असा प्रस्ताव नवाल यांनी सादर केला आहे.
दरम्यान सध्या प्राप्त झालेल्या, निकृष्ट कामांची तक्रार असलेल्या १५ गावांच्या योजनांची चौकशी करून त्याचा अहवाल उद्या, शनिवारपर्यंत सादर करण्याचा आदेश नवाल यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निकम यांना दिला आहे. या चौकशीसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके कालच संबंधित गावांना रवाना झाल्याचे समजले. भंडारदरा (अकोले), शिरसगाव, वळदगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव (सर्व श्रीरामपूर), बिटकेवाडी व चांदा खुर्द (कर्जत), जवळे बाळेश्वर (संगमनेर), त्र्यंबकपूर जातक (राहुरी), वाघुंडे खुर्द, भाळवणी, पळवे, अस्तगाव (पारनेर), मेहेकरी (नगर) याबरोबरच श्रीगोंदे तालुक्यातील काही गावांचाही समावेश असल्याचे समजले.