हनुमान टेकडी आता शुद्ध प्राणवायू व नैसर्गिक सौंदर्याचे लक्षवेधी स्थळ

प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : आनंदवनाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या मियावाकी वृक्ष प्रकल्पातील दहा हजार झाडांना आलेला बहर जिल्हय़ात लक्षवेधी ठरला आहे.दहा वर्षांपूर्वी ओसाड माळरान असलेल्या हनुमान टेकडीचा परिसर आता आबालवृध्दांच्या विरंगुळय़ाचे सर्वात मोठे केंद्र ठरला आहे. टेकडीवर वृक्षारोपण झाल्यास शहराला हिरवे आच्छादन मिळण्याची बाब वैद्यकीय जागृती मंचच्या सदस्यांनी उपस्थित केली. मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी वरोऱ्याच्या आनंदवनातील मियावाकी पद्धतीने केलेल्या वृक्षारोपणाची पाहणी केली. आनंदवनच्या दिवं. डॉ. शीतल आमटे यांचे त्यावेळी मार्गदर्शन घेऊन परतलेल्या मंचच्या चमूने २०१४ पासून टेकडीचा कायापालट करण्याचा चंग बांधला. काळा दगड असलेल्या टेकडीवर खोदकाम करण्यास बरेच परिश्रम लागले. त्यानंतर जपानी मियावाकी तंत्राने जलद घन वन पध्दतीने तीन फु टाचे खड्डे तयार करण्यात आले. त्यात शेणखत, तांदळाचा भुसा, तणस व अन्य सेंद्रिय पदार्थ टाकून अडीच फू ट अंतरावर एक वृक्षझाड व एक झुडपी झाड लावण्यात आले. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने अवघड जागेत झाडे वेगाने वाढली. तीन वर्षांत कडूलिंब, वड, पिंपळ, चंदन, शिसू व अन्य झाडे बहरली. जुलै २०१९ मध्ये चाळीस हजार वर्गफु ट जागेवर तीन हजार वृक्षांचे सात भूखंड तयार करण्यात आले. त्याच वर्षी गणेशोत्सवादरम्यान आणखी पाच हजार वर्गफु ट जागेवर मियावाकी पद्धतीनेच बकूळ, नीम, पिंपळ, शेवगा वृक्ष लावण्यात आले. दीड वर्षे वयाची ही झाडे आता पंधरा फु टाच्या वर वाढली आहे.

हा प्रयोग यशस्वी झाल्याने वैद्यकीय मंचच्या डॉक्टर व अन्य सदस्यांनी अत्यंत कठीण व दुर्गम अशा या परिसरातील दहा हजार वर्गफू ट क्षेत्रावर मेहनत घेण्याचे ठरविले. त्यावर बाराशे झाडे लावण्यात आले. वृक्ष वाढीसाठी पाच वर्षे लागण्याचा कालावधी अपेक्षित असताना केवळ एकाच वर्षांत झाडे बहरून कृत्रिम जंगल तयार झाले. आज या वृक्षराजीतून सहज फि रणे अशक्य होत असल्याची टिपणी डॉ. सचिन पावडे यांनी केली. टेकडीवरील या वृक्षराजीला कोंदण म्हणून सभोवताल दोनशे वृक्ष रांगेत बहरले आहे. लोक सहभागातून सिमेंटचे बाकडे लावण्यात आली. पक्षीप्रेमींच्या सहकार्याने शहरपक्षी असलेल्या नीलपंख पक्ष्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यशस्वी वृक्ष लागवडीची यशस्वी कमान यावर्षी परत रूंदावली आहे. प्रशासन, वनविभाग व पिपरी ग्राम पंचायतच्या सहकार्यातून आठ हजार वर्गफु टावर गुलाब फू लबाग तयार करण्याचा संकल्प झाला.

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व वन अधिकारी राकेश सेपट यांच्या उपस्थितीत पहिले रोपटे दोन दिवसापूर्वी लागले. स्वयंसेवी डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीने हनुमान टेकडी आता शुद्ध प्राणवायू व नैसर्गिक सौंदर्याचे शहरातील लक्षवेधी स्थळ झाले आहे. मंचचे डॉ. यशवंत हिवंज, श्याम भेंडे, प्रा. शेख हाशम, सतीश जगताप, प्रभाकर राऊत, माणिक ठाकरे, सदानंद सावरकर, सुनील महाजन, अनंत बोबडे, अरविंद लोहे, रवि चिकटे, गणेश खडगी यांची व अन्य सदस्यांची वृक्षराजीवर नियमित देखरेख असते.