तळेगाव एमआयडीसी येथील जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही मुंबईचे राहणारे असल्याचे समजते. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पाहुण्याकडे गेले होते. मृत्यू झालेल्यात सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. खेड तालुक्यातील येलवाडी गावातील स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्याकडे मयत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते. मृत झालेले तिघेही घाटकोपर मुंबई येथील रहिवाशी आहेत. रविवारी जाधववाडी धरणाकडे सर्वजण फिरायला गेले होते. त्यावेळी मयत अनिल कोंडीबा कोळसे यांचा पाय घसरून ते थेट धरणात पडले. यांच्यापाठोपाठ प्रितेश आणि प्रशिल हे देखील धरणात पडले यामध्ये सर्वांचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत असून आज सकाळी १२ च्या सुमारास ही दुःखद घटना उघडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कोंडीबा कोळसे वय-५८, प्रितेश रघुनाथ आगळे वय-३२ आणि प्रशिल अमोल आढाव वय-७ अशी मृत्यू झालेल्या मुलाचे आणि व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व मुंबई मधील घाटकोपर येथील राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर संगीता दादासाहेब गायकवाड, उत्कर्षा दादासाहेब गायकवाड, स्वप्नील दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब पोपट गायकवाड अशी बचावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील दादासाहेब गायकवाड (रा.येलवाडी ता.खेड जि.पुणे) यांच्याकडे उन्हाळ्याची सुट्टी निमित्ताने घाटकोपर मुंबई येथून पाहुणे आले होते. ते त्याच्यासह एकुण सात जण नवलाख उमबरे गावच्या हद्दीतील जाधववाडी धरण येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यातील काहीजण धरणातील पाण्यात उतरले, त्यातील अनिल कोंडीबा कोळसे यांचा पाय घसरल्याने त्यानी त्यांच्या मागे उभे असलेले दादासाहेब पोपट गायकवाड व प्रशील अमोल आढाव यांना पकडले असता ते दोघेही पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे हे गेले.

मात्र, ते ही पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी सोबत असलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड व उत्कर्षा दादासाहेब गायकवाड या गेल्या परंतु, त्या ही बुडू लागल्याचे पाहून आणि आरडाअोरडा ऐकून शेजारीत चालू असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी त्यांना बाहेर काढले. पैकी प्रशील अमोल आढाव वय सात, अनिल कोंडीबा कोळसे, प्रितेश रघुनाथ आगळे यांना वर काढून तातडीने तळेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला. तर चार जण या घटनेत बचावले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three death in jadhav wadi dam
First published on: 19-05-2019 at 17:08 IST