साताऱ्यात एक तर कराडमध्ये दोन अशा तीन करोनाबाधितांची आज मंगळवारी वाढ होऊन सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२२ झाली. सातारा येथे निष्पन्न झालेला करोनाग्रस्त खटाव तालुक्यातील पहिलाच रुग्ण आहे. दिवसभरात सातारा जिल्हा रुग्णालयात १९९ तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात १० जण करोनासंशयित म्हणून दाखल झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील १२२ करोनाबाधितांमध्ये ८९ रुग्ण कराड तालुक्यातील असून, काल कराडमधीलच सर्व १५ रुग्ण करोनामुक्त झाले होते. आजवर जिल्ह्यात उपचारांती बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. तर, दोन रुग्ण यापूर्वीच उपचारादरम्यान मृत पावले आहेत.

दरम्यान, कराडचे उपजिल्हा रुग्णालय करोनाविरहित करून येथीलच सह्यद्री हॉस्पिटलमध्ये करोना संशयित व संसर्गितांसाठी ५० खाटांची सुसज्ज व्यवस्था केली गेली आहे. काल सोमवारी एकही करोनाबाधित नव्याने निष्पन्न न होता, करोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असलेले १५ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या स्वगृही आरोग्यस्वास्थ्यासह सुखरूप पोहोचल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण होते. मात्र, आज करोनाग्रस्तांची संख्या तीनने वाढल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गेल्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यातून हजारो परराज्यातील नागरिक त्यांच्या गावी निघाले आहेत. आज सातारहून १,३२० लोकांना घेऊन खास रेल्वेने मध्यप्रदेशातील रेवाकडे प्रस्थान केले.