बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे करोना तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तर, चार नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात या तीन बाधित रुग्णांसह २९ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत २३ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २३ आहे. सध्या बुलढाणा, शेगाव व खामगाव येथील रुग्णालयात पाच करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात  रविवारी, १७ मे रोजी ७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३ अहवाल सकारात्मक आले आहेत. यामध्ये खामगाव येथील ६० वर्षीय महिला, शेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष आणि मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील ७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. खामगाव येथील महिला मुंबईवरून दाखल झाली होती. शेगाव येथील रुग्ण हा पालिकेचा सफाई कर्मचारी आहे, तर मुंबई येथून परतलेल्या नरवेल येथील कुटुंबातील मुलीला करोनाची बाधा झाली. या करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तपासणी करून नमुने घेण्यात येत आहे. त्यांचा परिसर प्रतिबंधित करून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यातील आणखी ६८ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.