नांदेड : देशासह राज्यात फैलावत असलेल्या करोना विषाणूजन्य आजाराचा नांदेडात जोर वाढला असून शुक्रवारी सकाळी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात तीन नव्या रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी दिली. नव्याने सकारात्मक आलेले दोन रुग्ण अबचलनगर व एक रुग्ण रविनगर भागातील असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील पिरबुऱ्हाणनगर भागाताल एका वयोवृद्धाला २१ एप्रिल रोजी करोना विषाणूजन्य आजाराची बाधा झाली होती. त्यानंतर या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ दुर्धर आजार असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिलेचे स्वॅब सकारात्मक आले होते. या दोन्ही करोनाग्रस्त रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने नांदेडमध्ये खळबळ माजली होती. देगलूर नाका भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अबचलनगर भागातील एका ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.

प्रशासनाने ३० एप्रिल ते १ मे दरम्यान घेतलेल्या ९७  रुग्णांच्या स्वॅबमधील गुरुद्वारा परिसरातील लंगरसाहिब येथील २० कारसेवकांच्या स्वॅबचा अहवाल सकारात्मक आला होता. पंजाबहून परतलेल्या व अबचलनगर भागात वास्तव्यास असलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर या सर्वाचे अहवाल पहिल्या तपासणीत नकारात्मक आले होते. तसेच पंजाबहून परतलेल्या त्यांच्या संपर्कातील २३ जणांच्या घशाचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी ७ मे रोजी पाठविले होते. त्या सर्व स्वॅबचा अहवाल प्रशासनास शुक्रवारी प्राप्त झाला. यामध्ये अबचलनगर येथील एक महिला वय ३६, एक पुरूष वय ३८ तसेच रविनगर येथील एक पुरूष वय ३५ या तिघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्ही रुग्णांवर यात्री निवास परिसरातील कोव्हीड सेंटर येथे उपचार चालू असल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले.

नांदेडमध्ये तीन नवे रुग्ण वाढल्याने नांदेडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ३८ वर गेली असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. ३४ रुग्णांवर शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नांदेडकरांनी घराबाहेर न पडता घरीच राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

नकारात्मक झाले सकारात्मक

नांदेड शहरातील आज सापडलेल्या तिन्ही रुग्णांचे यापूर्वीही घशाचे स्वॅब घेतले होते. पहिल्या तपासणी अहवालात या तिघांचेही अहवाल नकारात्मक आले होते. पुन्हा नव्याने घेतलेल्या स्वॅबमध्ये हे सकारात्मक झाले असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड  शहरातील पिरबुऱ्हाणनगर, रहमतनगर, अबचलनगर, नगिना घाट, अंबानगर हे पाच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. यात आता नव्याने आज रविनगर भागाचा समावेश झाल्याने शहरात सहा प्रतिबंधित क्षेत्र झाली आहेत.