लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आणखी तिघांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता ५६ वर पोहोचली. १३१ अहवाल नकारात्मक आले आहेत. एका रुग्णाला आज सुट्टी देण्यात आली.

बुलडाणा येथील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३४ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये १३१ अहवाल नकारात्मक, तर तीन जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील ३९ वर्षीय व ६० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे.
दरम्यान, आज बुलडाणा येथील कोविड केअर केंद्रातून नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील २१ वर्षीय रुग्णाला सुट्टी देण्यात आली.

मागील दहा दिवसांपासून करोना लक्षणे नसल्यामुळे केंद्रातून त्याला घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ३३ जणांनी करोनावर मात केली. सध्या रुग्णालयात २० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील अद्याप ३४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२०३ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.