करोनाच्या पार्श्वभूमिवर घराबाहेर पडण्यास निर्बंध असतांना घरात जाण्याचे आवाहन करणाऱ्या गस्ती पथकावर १५ ते १८ जणांनी केलेल्या हल्ल्यात शिरपूर तालुका ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील लाकडय़ा हनुमान गावात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात हवालदार योगेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास लाकडय़ा हनुमान गावात लोकांनी घराबाहेर पडू नये, घरात निघून जावे असे आवाहन गस्ती पथकाव्दारे करण्यात येत होते. रस्त्याने फिरणाऱ्या काही जणांना पोलिसांनी हटकले. संचारबंदी असल्याने घरी निघून जाण्यास त्यांनी लोकांना सांगितले. त्याचा राग येऊन संबंधितांनी इतर लोकांना बोलावून गोंधळ घातला. आरडाओरड करीत त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. हवालदार लक्ष्मण गवळी, पोलीस नाईक बाळू चव्हाण, चालक राजु गिते हे जखमी झाले. याप्रकरणी रामदास पाडवी, सहदेव पाडवी, दीपक पाडवी, दुकानदार विश्वास पाडवी यांच्यासह १० ते १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण रूग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य उपलब्ध

करोना संशयितांवर जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांन आवश्यक असलेले व्यक्तिगत संरक्षक पोषाख (पीपीई), मास्क, हातमोजे यांची उपलब्धता होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. टाळेबंदीच्या दुसऱ्या आठवडय़ात अखेर हे साहित्य उपलब्ध झाले आहे. साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर, पिंपळनेर येथील ग्रामीण रूग्णालयांना यांचे वाटप केले जात आहे. तोडक्या साधन सामग्रीसह कर्मचारी संशयित रूग्णांना सेवा देत आहेत. आवश्यक साधन सामग्री मिळण्यास टाळेबंदीतही दोन आठवडे लागले. आता ८५ पीपीई संच, एन-९५ मास्क, दोन हजार सर्जिकल मास्क यासह अन्य साहित्य जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडे आले आहे. उशिरा का होईना सुरक्षा साहित्यांचा पुरवठा झाल्याने डॉक्टर, परिचारिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे १००, तर महापालिकेकडे ५० पीपीई संच आहेत. हिरे महाविद्यालयात तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने या महाविद्यालयास अधिक पीपीई संच तसेच इतर सामग्री मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मनपातर्फे ११ हजार घरांचे सर्वेक्षण

महानरपालिकेतर्फे ११ हजाराहून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून विदेशातून तसेच इतर शहरातून आलेल्या नागरिकांची माहिती याव्दारे घेतली जात आहे. कुटुंबनिहाय सर्वेक्षणास काही भागात विरोध होत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. हे सर्वेक्षण करोनाविरोधातील पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महत्वपूर्ण आहेत. या माहितीआधारेच आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. सर्वेक्षणास विरोध करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपातर्फे आयुक्तांनी दिला आहे.

धुळे जिल्हाधिकारीपदी संजय यादव नियुक्त

धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची मार्चमध्येच बदली करण्यात आली होती. परंतु, करोना साथ उद्भवल्याने आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहण्यासाठी त्यांनाच जिल्हाधिकारी म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते.

जिल्हा बँकेतर्फे १५ एप्रिलपासून पीककर्ज वाटप

धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे १५ एप्रिलपासून नवीन हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू होणार आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करणाऱ्यांना हे पीककर्ज दिले जाणार आहे. कर्जाची रक्कम एटीएमव्दारे काढता येईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. टाळेबंदीमुळे पीककर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. पीककर्ज रक्कम एटीएमव्दारे प्रत्येक दिवशी २० हजार रूपये याप्रमाणे मिळेल. शेतकऱ्यांनी पीककर्ज रक्कम एटीएममधून काढतांनाही एकमेकांपासून दूर उभे राहण्याचे आवाहन कदमबांडे आणि चौधरी यांनी केले आहे.