ठाणे महापालिकेने ३० वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सक्ती केली आहे. धोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र पालिकेने नेमलेल्या तीन ऑडिटर्सने एकाच इमारतीचे तीन वेगळे अहवाल दिले आहेत. ‘इमारत दुरुस्तीयोग्य आहे’, ‘इमारत पाडण्यात यावी’ आणि ‘दुरुस्ती केल्यावर इमारतीला तीन ते चार वर्षे धोका नाही’ हे एकाच इमारतीबाबत देण्यात आलेले तीन वेगळे अहवाल आहेत. त्यामुळे महापालिकेने नेमलेले ऑडिटर्स नेमके काय काम करतात? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महापालिकेने काढलेला स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेशच संशयाच्या भोवऱ्यात आहे.

ठाण्यातल्या वर्तकनगर भागातल्या म्हाडा वसाहतीत १०० इमारती अशा आहेत ज्या सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी उभारल्या गेल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासावर अनेक बांधकाम व्यावसायिकांचा डोळा आहे. त्याचमुळे महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारती धोकादायक ठरवण्यात येतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ठाण्यातल्या गंगाधर को ऑपरेटिव्ह सोसायटीतल्या इमारत क्रमांक ४२ ची अवस्थाही वेगळी नाहीये. ११ नोव्हेंबर २०१३ रोजी ठाणे महापालिकेने नेमलेल्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटर विनायक चोपडेकर यांनी या इमारतीचे ऑडिट केले होते. ही इमारत धोकादायक आहे, त्यामुळे पुनर्बांधणी करावी असा अहवाल त्यांनी दिला होता. त्यानंतर ६ जून २०१४ रोजी सेंटर टेक या संस्थेने याच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले, ज्यानंतर इमारत काही प्रमाणात धोकादायक असली तरीही तिची दुरुस्ती होऊ शकते असे मत नोंदवले. यानंतर २ वर्षांनी म्हणजेच ६ जून २०१६ ला पुन्हा एकदा मे.साद कन्सल्टंट यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानंतर दुरुस्ती झाल्याने या इमारतीला ३ ते ४ वर्षे धोका नसल्याचा अहवाल दिला. ज्यानंतर इमारतीतल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र आता यावर्षी पुन्हा १४ जूनला सोसायटीला महापालिकेने पत्र पाठवून व्हिजेटीआय किंवा आयआयटीसारख्या संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या असे आदेश दिले आहेत. तीन सल्लागारांनी वेगवेगळे अहवाल दिल्याने, पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचेही या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करेपर्यंत काहीही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची असेल असेही म्हटले आहे. त्यामुळे आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी रहिवाशांची अवस्था झालीये. आता आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.