सोनसाखळ्या हिसकावण्याच्या आरोपाखाली सांगली ग्रामीण पोलीसांनी पकडलेल्या तीन अट्टल चोरांनी रविवारी रात्री उशीरा पोलीस ठाण्यातील वीज गेल्याचा फायदा घेत छतावरील कौलं काढून पोबारा केला. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना तासगाव पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारीच त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलीस ठाण्यातून पळ काढला.
कुमार पवार (वय २३), राहुल माने (१९) आणि राजेंद्र जाधव (२३) (सर्व रा. पुसेगाव, जि. सातारा) अशी पळून गेलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तासगावमध्ये रविवारी वादळी वाऱयासह पाऊस झाला. त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यातच तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश बनकर रविवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त पोलीस कर्मचारी निरोप समारंभात गुंतले होते आणि वीजही नव्हती. या सगळ्याचा फायदा घेत तिन्ही चोरट्यांनी कौलं उचकडून पोलीस ठाण्यातून पळ काढला. तिन्ही चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.