ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढणे ही सुखावणारी बाब असली तरी वाघांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ताडोबामध्ये विजेच्या धक्क्याने आणखी एका वाघाने जीव गमावला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भामढेळी गावातील एका शेतात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने छोटी तारा अर्थात टी-७ या वाघिणीच्या ३ वर्षांच्या वाघाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. ताडोबा व्यवस्थापनाने संशयित शेतकरी ऋषी नन्नावरे याला ताब्यात घेतले आहे.

हा वाघ दोन दिवसांपासून भद्रावती, मोरवा परिसरात भटकत होता. ही माहिती चंद्रपूर वन विभाग, ताडोबा व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्याच्या हालचालीची प्रत्येक नोंद संगणकावर होत असताना सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष झाले. हा वाघ मृतावस्थेत पडून असल्याची माहिती ताडोबा व्यवस्थापनाला शनिवारी मिळाली. शेतातील विद्युत तारांच्या कुंपणात अडकून त्याचा मृत्यू झाल्याचे वनाधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळले.

२२ महिन्यांत ३३ वाघांचा बळी

गेल्या २२ महिन्यांत ३३ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात २२ मृत्यू हे नैसर्गिक होते. १ मृत्यू अपघाती तर १० वाघांची शिकार झाली आहे. यामध्ये सात वाघ व तीन वाघिणींचा समावेश आहे. १५ नोव्हेंबरला चिचपल्लीच्या जंगलात रेल्वेच्या धडकेत तीन बछडय़ांचा मृत्यू झाला होता.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

  • डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आला होता. हा वाघ सलग १४ तासांपासून एकाच ठिकाणी का बसलेला आहे, असा प्रश्न वन अधिकाऱ्यांना कसा पडला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • ताडोबाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर शेतकरी तारांच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडत असल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील इतर वाघांनाही धोका निर्माण झाला आहे.
  • ताडोबाच्या आजूबाजूला असलेली शेती व मोहुर्ली, भामढेळीत रिसॉर्ट उभे झाल्याने तेही वाघांच्या नैसर्गिक हालचालीसाठी धोकादायक ठरत आहेत.