एनटीसीएच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम

सिंदेवाही येथे वाघिणीच्या बछडय़ाचा अन्नपाण्याविना मृत्यू आणि तळोधी बाळापूर येथे वाघिणीच्या मृत्यूनंतर तिचे बेपत्ता झालेले तीन बछडय़ांचे प्रकरण बघता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेरच्या जंगलातील २५ बछडय़ांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) बछडय़ांच्या वाघिणींचे नियमित मॉनिटरिंग करण्याचे निर्देश दिलेले असतांनाही वनखात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच लागोपाठ अशा घटना समोर येत आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८८ वाघ आणि सुमारे ३० बछडय़ांचे नियमित मॉनिटरिंग आणि संरक्षण व्याघ्र संरक्षण दल व वनपथकाकडून होत असले तरी ताडोबाबाहेरील जंगलातील ५८ वाघांसोबत २५ बछडय़ांचेही योग्य पध्दतीने संरक्षण होत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. कारण वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगलात नुकत्याच एका वाघिणीचा मृत्यू झाला. तिचे ३ बछडे तेव्हापासून अचानक बेपत्ता झाले. एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक राजपूत यांनी त्यांना बघितल्याचा दावा केला असला तरी याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम असून त्यांचे छायाचित्रही एफडीसीएमकडे नाही, तसेच ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रात अन्नपाण्याविना अवघ्या २२ दिवसांच्या बछडय़ाचा मृत्यू झाला. या बछडय़ाच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे वनाधिकारी व कर्मचारी जबाबदार आहे. कारण, ताडोबाबाहेर ब्रम्हपुरी, मध्य चांदा व चंद्रपूर वन विभागासोबतच एफडीसीएमचे जंगल आहे. या जंगलात आज २५ बछडे व सुमारे १८ बछडय़ांच्या वाघिणी आहेत. एनटीसीएने त्यांचे नियमित मॉनिटरिंग करण्याचे निर्देश दिलेले असूनही वनाधिकारी वाघीण व बछडय़ांचे मॉनिटरिंग करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पावसाळ्यात तर जंगलात पायीच मॉनिटरिंग करणे अतिशय आवश्यक आहे, परंतु वनाधिकारी व कर्मचारी तसेच पथकातील कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच तळोधी व सिंदेवाहीसारख्या घटना लागोपाठ घडल्या आहेत. मात्र, एफडीसीएमचे अधिकारी जंगलात जातच नसल्याची माहिती आहे. कारण, एप्रिलमध्येच तळोधी येथील मृत वाघीण तिच्या बछडय़ासह दिसलेली होती. तेव्हा ती बछडय़ांना सोडून गेल्यामुळे वन विभागात खळबळ उडाली होती. मात्र, २४ तासातच ती परतही आली होती. किमान त्यानंतर तरी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाघीण व तिच्या बछडय़ांवर नियमित लक्ष ठेवले असते, तर ही वेळ आली नसती, परंतु वनपथक पायी फिरत नसल्याने व जंगलात जाण्यास आणि संरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आता याच क्षेत्रातील २५ बछडय़ांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉनिटरिंगकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनीही केल्या आहेत. मात्र, कारवाई होत नसल्याने हा प्रश्न आहे तेथेच आहे.