शहरातील टोलवसुलीला स्थगिती देण्यात आल्याच्या निर्णयाचे आज येथे जोरात स्वागत करण्यात आले. शासनाच्या निर्णयानंतर मंगळवारी सायंकाळी शहरात जल्लोष करण्यात आला. या निर्णयाचे शहरातील सर्व पक्ष, संघटना सामाजिक संस्था यांनी फटाक्याची आतषबाजी करीत स्वागत केले आहे. दुसरीकडे ‘आयआरबी कंपनी’ने सर्व टोलनाक्यावरील वसुली थांबवल्यामुळे नाक्यावरील वाहतूक गेल्या कित्येक दिवसानंतर टोलशिवाय सुरू झाल्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आश्चर्याचा धक्का बसला.
शहरातील अंतर्गत रस्ते बांधणीचे काम आयआरबी कंपनीने केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर कंपनीने टोल आकारणी सुरू केल्यावर जनआंदोलन सुरू झाले होते. संतप्त जमावाने दोन वेळा टोल नाक्याची जाळपोळ, मोडतोड केली होती. टोल वसुलीवरून वाहनधारक व कर्मचाऱ्यांतील वादावादी नेहमीची बाब बनली होती. टोल वसुलीवरून राजकीय वादही रंगला होता. टोल रद्द करण्याची आश्वासन देऊन महायुतीने कोल्हापुरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले होते.
दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी टोल आकारणी रद्द होईल, असे विधान केले होते. पाठोपाठ मंगळवारी या प्रश्नी मंत्रालयात बठक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित शिवसेनेचे एकनाथ िशदे व भाजपाचे चंद्रकांत पाटील या दोघांनी कोल्हापुरातील टोल आकारणी पंधरा दिवस होणार नाही, असे सांगितले. तर, इकडे करवीर नगरीत आयआरबी कंपनीने स्वतहूनच सर्व नऊ टोल नाक्यावरील वसुली थांबविली. अचानक टोल नाके मनुष्यविरहित, सुनेसुने झाल्याने वाहनधारकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबईतील टोल आकारणी थांबल्याच्या निर्णयाचे वृत्त समजताच शहरात आनंदाला उधाण आले. टोलविरोधी कृती समिती, भाजपा, शिवसेना यांच्या वतीने शहराच्या विविध भागात फटाक्याची आतषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेक संघटनांनी फलकावर अभिनंदनाच्या प्रतिक्रिया नोंदविल्या.
टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, टोलविरोधी आंदोलनात प्राणपणाने लढणाऱ्या कोल्हापूरच्या शाहू प्रेमी स्वाभिमानी जनतेचा हा दणदणीत विजय आहे. टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीने सपशेल माघार घेतली आहे. पंधरा दिवसांनंतर या कंपनीला करवीर नगरीतून कायमचा अलविदा करावा लागणार आहे. िशदे-पाटील या मंत्रिद्वयाच्या भूमिकेचे कोल्हापुरातील जनता स्वागत करीत आहे. तर ‘कॉमनमॅन संघटने’चे अध्यक्ष बाबा इंदूलकर यांनी टोलविरोधी कृती समितीने रस्ते प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणल्याने त्याची दखल शासनाला घ्यावी लागली. यामुळे सत्य हे नेहमी सत्य असते हे उघड झाले असून उशिराच्या शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहोत, असे म्हटले आहे.