करोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला असून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन नोंदणी मोठय़ा प्रमाणात रद्द झाल्याने दररोज १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान होत आहे. तसेच आनंदवन व लोकबिरादरी प्रकल्पात मुंबई, पुणे , ठाणे,नाशिक, कल्याण या भागातील पर्यटकांची नोंदणी रद्द झाली आहे. त्याचाही फटका आनंदवन व लोकबिरादरी प्रकल्पाला बसला आहे.

नागपूर, यवतमाळ पाठोपाठ चंद्रपुरातही संशयित रूग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीती आहे.  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. व्याघ्र दर्शनासाठी मार्च ते जून हा कालावधी योग्य आहे. त्यामुळे या काळात ताडोबा प्रकल्पात ऑनलाईन नोंदणी मोठय़ा प्रमाणात असते.  मात्र १५ एप्रिल पर्यंत विदेशी पर्यटकांसाठी व्हीसा बंद केल्यामुळे बहुसंख्य विदेशी पर्यटकांनी त्यांची ऑनलाईन नोंदणी रद्द केली आहे. तसेच मुंबई,पुणे,नाशिक, ठाणे, कल्याण, बंगाल, दिल्ली या भागातील  पर्यटकांनीही नोंदणी रद्द केली आहे. त्याचा थेट परिणाम रिसॉर्ट, हॉटेल, जिप्सी, गाईड तथा ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायावर झाला आहे. एका रिसॉर्ट मालकाने दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे ताडोबाचे दररोज किमान १० ते १२ लाखाचे नुकसान होत आहे. स्थानिक बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.  नवीन चित्रपट लागले असतांनाही चित्रपट गृह, मल्टिप्लेक्स मध्ये प्रेक्षक नाहीत. वरोरा येथील प्रसिद्ध आनंदवन प्रकल्प करोनामुळे काही दिवसांसाठी बंद आहे. लोकबिरादरी प्रकल्पातील पर्यटकांची संख्या यावर्षी प्रथमच कमालीची रोडावली असल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली. दरवर्षी अनेक विदेशी पर्यटक लोकबिरादरीत येतात. मात्र करोनाच्या उद्रेकानंतर एकही विदेशी पर्यटक आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. याचा थेट परिणाम आनंदवन व लोकबिरादरीच्या  उत्पन्नावरही झालेला आहे.