चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडीचे विघ्न

गौरीगणपतीचा सण साजरा करून चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले, मात्र माणगाव ते दासगावदरम्यान वाहनांची कोंडी झाल्याने अडकून पडले. तीस ते चाळीस मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तब्बल अडीच ते तीन तासांचा कालावधी लागत होता.  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले होते.

कोकणात जाताना त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला होता. मात्र मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या कोंडीमुळे ते अडकून पडले होते. हा अनुभव लक्षात घेऊ गौरीगणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब टाळला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.  दासगाव ते माणगाव या दरम्यान मुंबईच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीस ते चाळी किलोमीटर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माणगाव बाजारपेठ, लोणेरे नाका, टोल फाटा, इंदापूर बाजारपेठ ही वाहतूक कोंडीची मुख्य केंद्रे होती. वाहनांची प्रमाणाबाहेर वाढलेली संख्या, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालक, अपुरा पोलीस बंदोबस्त आणि किरकोळ अपघात या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याचे दिसून आले.

वडखळ नाका, रामवाडी परिसर आणि खोपोली बायपास या पट्टय़ातील वाहतूक नियंत्रित ठेवण्यात पोलिसांना यश आले असले तरी दासगाव ते इंदापूर या पट्टय़ात वाहतूक नियंत्रित ठेवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले.

काही वाहनचालकांचा आतताईपणाही या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरला. महामार्गाची दुरवस्था आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते यांनी वाहतूक कोंडीत अधिकच भर घातली.

गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक प्रचंड वाढत असते. या काळात दोन हजार एसटी बसेस आणि तेवढय़ाच खासगी बसेस महामार्गावर सोडल्या जातात. याशिवाय १५ ते २० हजार खासगी वाहने दररोज महामार्गावरून जा-ये करतात. त्यामुळे वाहनांची संख्या अधिकच वाढते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा महामार्ग अरुंद असल्याने वाहतुकीचे योग्य नियमन करणे गरजेचे असते.

याचा अनुभव गाठीशी असूनही या वर्षी महामार्गावर परतीच्या प्रवासात अपुरा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा आरोप चाकरमान्यांनी केला. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने दुपारनंतर महामार्गावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, सुधागड पाली, तळा, येथून जादा पोलिसांची कुमक मागविण्यात आली. कोलमडलेली वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत कोंडी सुटू शकली नव्हती.