पावसाच्या तोंडावर रोजगाराच्या अपेक्षेने जूनच्या पहिल्या आठवडय़ात स्वत:च्या झोपडय़ांकडे परतलेले बहुसंख्य आदिवासी लांबलेला पाऊस व खोळंबलेल्या लावण्या यामुळे तीन आठवडे कामाविना घरी हातावर हात धरून बसले होते. वर्षभर घरीच राहिलेल्या पुरुषांना गेल्या आठ महिन्यांत महिनाभरापेक्षा अधिक काळ रोजगार मिळालेला नाही. उपचारांची कक्षा वाढवत आदिवासी मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत असले तरी शिक्षण व रोजगार या दोन्ही पातळ्यांवर कोणताही बदल झालेला नसून वाडा, विक्रमगड, मोखाडा येथील आदिवासी वर्षभरानंतरही नियमित रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत.

पावसाच्या निव्वळ शिडकाव्यामुळेही संपूर्ण पालघर तालुका कोवळ्या तृणपात्यांच्या पोपटी रंगात खुलून दिसत आहे. काही ठिकाणी पेरणी झाली असली तरी पावसावर अवलंबून राहत पोटापुरते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र गेल्या आठवडय़ापर्यंत मातीला नांगर लावलेला नव्हता. त्यामुळे जमिनीचा तुकडाही हाताशी नसलेले आदिवासी दुसऱ्यांच्या शेतीकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या वर्षी घरातल्या मुलांचा कुपोषणाने मृत्यू होताना पाहिलेल्या आदिवासींच्या घरातही हीच स्थिती आहे. मोखाडय़ातील कळमवाडीत २८ ऑगस्टला दोन वर्षांचा सागर वाघ कुपोषणाचा बळी ठरला. पावसाळ्यानंतर तीन भावांसोबत नाशिकला दगडखाणीवर गेलेले सागरचे वडील दोन महिन्यांपूर्वी घरी परतले. मात्र त्यानंतर वन विभागाकडून चरी खणण्याचे आठवडाभराचे काम वगळता रोजगार मिळालेला नाही, असे सागरची आई म्हणाली. सागरच्या आईला दोन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. दोन महिन्यांचा अविनाश व दीड वर्षांची नंदिनी हिला खेळवणाऱ्या २२-२३ वर्षांच्या आईला अंगणवाडी व रुग्णालयांकडून आहार व उपचार चांगले मिळत आहेत. त्यामुळे अविनाश व नंदिनीची तब्येतही चांगली आहे. मात्र मुलांना स्वत: खाऊपिऊ घालण्याचे स्वातंत्र्य देणारी आर्थिक सक्षमता कधी मिळणार, हा प्रश्न कळणवाडीतील इतर घरांमधील बायाबापडय़ांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

शिक्षणाची आबाळ

कळमवाडीच्याच शेजारी असलेल्या खोचमध्येही गेल्या वर्षी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे पाय लागले होते. ईश्वर सवरा या दोन वर्षांच्या मुलाचा गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. मृत्यूवेळी त्याचे वजन पाच किलोही नव्हते. ईश्वरची मोठी बहीण सोनाली तेव्हा चौथीत होती. पावसाळ्यानंतर घर पाठीशी बांधून ठाणे-नाशिकला पोटापाण्यासाठी जाण्याचा नामदेव सवरा यांचा विचार होता. सोनालीला शाळा सोडायची नव्हती. दरम्यानच्या काळात गावात रस्ता रुंदीकरणाची कामे आली आणि सवरा कुटुंबीय खोचमध्येच थांबले. पंधरा दिवस रस्त्याचे काम मिळाले. त्यानंतर गावात गवत ओढायला, लाकूडफाटा करायला आणखी दहा-पंधरा दिवस काम मिळाले. याच पैशांवर बाकीचे महिने काढतो आहे, असे नामदेव सवरा म्हणाले. पाचवीत शिकत असलेली सोनाली व पहिलीत गेलेला कृष्णा या दोघांनाही शाळेतून आणि संस्थेतून शैक्षणिक वस्तू मिळाल्या आहेत. मात्र या वस्तू स्वत: खरेदी करण्याची क्षमता सवरा कुटुंबात यावी यासाठी कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत.

दूरवरच्या मोखाडय़ात वाहतूक, पायाभूत सुविधा यांचेच वावडे असल्याने नजीकच्या काळात कारखाने, रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता दुरापास्तच आहे; पण तुलनेने जरा मोठे शहर असलेल्या वाडा तालुक्यात बाजारापासून हाकेच्या अंतरावरील पेटरांजणीमध्येही अनेकांना रोजगार उपलब्ध नाही. गेल्या वर्षी ९ सप्टेंबरलाच रोशनी सवरा या पेटरांजणीतील मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हा सात महिन्यांची गर्भवती असलेल्या तिच्या आईला अंगणवाडी व रुग्णालयाकडून तत्परतेने सेवा व उपचार देण्यात आले. त्यामुळे आता सात महिन्यांचा झालेला रोशन सवरा व आईची प्रकृती उत्तम आहे. हेच उपचार आधी मिळाले असते तर, हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरित राहणार आहे. ग्रामपंचायतीकडून मंजूर झालेल्या घराचे काम करण्यासाठी गुरुनाथ सवरा पेटरांजणीतच राहिले. अनेक हेलपाटे घातल्यावर विटांचे घर उभे राहिले असल्याने डोक्यावर छप्पर मिळाले, मात्र पोट भरण्यासाठी कामच नाही, असे ते म्हणाले. घरात आई व मुलांना आणखी काही दिवस पौष्टिक आहार मिळेलही, पण त्यापुढे तगण्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ते आहेत.

मोखाडय़ाच्या शाळेला शौचालय मिळाले..

खोच ग्रामपंचायतीच्या धोंडामाऱ्याची मेठ येथील शाळेच्या गळके छप्पर व शौचालयाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यास विलंब करणाऱ्या प्रशासनाच्या उदासीन दृष्टिकोनाबाबत ‘लोकसत्ता’ने लिहिले होते. त्यानंतर तातडीने कारवाई होत शाळेला नवीन शौचालय बांधून देण्यात आले. तीन शिक्षक व दोन पर्यवेक्षक असलेल्या या शाळेची स्थिती आजूबाजूच्या शाळांपेक्षा बरी असल्याने बाजूच्या परिसरातील मुलेही इथे येतात. पहिली ते आठवीचे वर्ग भरणाऱ्या या तीन खोल्यांच्या शाळेमागे एक शौचालय होते. शाळेवर झाड पडले आणि दोन वर्गखोल्यांचे छप्पर व मागचे शौचालय मोडकळीला आले. त्यामुळे पावसाचे उर्वरित महिने पहिली ते आठवीचे दीडशेहून अधिक विद्यार्थी एकाच खोलीत बसत होते. पावसाळ्यानंतर शाळेची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न करूनही कोणी दाद देत नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आणि विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या कार्यालयात नेऊन बसवले. ही माहिती ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यावर तातडीने निधी उपलब्ध झाला. शौचालय बांधून देण्यात आले. गळके छप्पर काढून त्याऐवजी पत्रे बसवले जाणार आहेत व तीन वर्गखोलीच्या शाळेला आणखी एक वर्गही मिळणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मुकणे यांनी दिली.