News Flash

नक्षलवाद्यांच्या फलकांची गावकऱ्यांकडून होळी

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह पाळतात. 

गावकऱ्यांनी जाळलेले नक्षलवाद्यांचे फलक.

शहीद सप्ताहाचा तीव्र निषेध

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला शुक्रवारपासून सुरुवात झालेली असतांना गडचिरोलीच्या जंगलात स्थानिक आदिवासींनीच नक्षलवाद्यांच्या फलकाची जाळपोळ करून या शहीद सप्ताहाचा तीव्र निषेध केला आहे. नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजवर आम्ही बंदमध्ये सहभागी झालो. परंतु त्याचा काही फायदा आम्हाला झाला नाही. उलट आम्ही विकासापासून दूर गेलो. परंतु आता आम्ही नक्षलवाद्यांच्या आव्हानाला भीक घालणार नाही, उलट त्यांनी लावलेल्या फलकांची होळी करू, अशी कठोर भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने लोकांचे समर्थन कमी होत असल्याचे बघून शहीद सप्ताहात प्रथमच नक्षलवादी हादरले आहेत.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह पाळतात.  यात नक्षलवाद्यांनी स्थानिक आदिवासींना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु नक्षलवाद्यांच्या या आवाहनाला बळी न पडता गावकऱ्यांनीच नक्षल्यांच्या फलकांची होळी केली आहे. मरकेगाव भागात सावरगाव गॅरापत्ती रस्त्यावर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्याचे फलक लावण्यात आले होते. नक्षलवाद्यांनी लावलेले फलक जाळून गावकऱ्यांनी नक्षल सप्ताहाचा निषेध केला. अतिदुर्गम आदिवासी भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने निर्धार करून नक्षलवाद्यांच्या २८ जुलै शहीद सप्ताहाला विरोध करीत नक्षलवाद्यांनी लावलेले लोकशाही विरोधी, सप्ताह पाळण्याचे व नक्षल समर्थनाचे फलक स्वत: काढून रस्त्यावर जाळून टाकले. आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले. आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळून आमचा विकास का थांबवायचा असा परखड सवाल करीत गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांविरुध्द आवाज उठवला आहे. जे नक्षलवादी आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही, असे आदिवासी दुर्गम भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने ठरवून नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार करीत नक्षलवाद्यांनी लावलेले फलक काढून त्याची होळी केली.  मरकेगाव भागात २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवून १५ पोलिस जवानांना मारले त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांचा विरोध होत आहे. इतर गावकऱ्यांनीही नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचे समर्थन न करता एकजुटीने नक्षलवाद्यांविरुद्ध आवाज उठवून बंद न पाळण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर मार्गावर चंद्रखंडी देवस्थान मंदिराजवळ पोलिस दल व नक्षलवादी संघटनांनी परस्परविरोधी फलक लावून एकमेकांच्या कार्याचा निषेध नोंदवत जनतेला आवाहन केले. नक्षलवादी चळवळ स्थापनेपासून विविध घटनेत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुर्गम भागातील जंगल परिसरात स्मारके उभारून श्रध्दांजली कार्यक्रम घेतला जातो तसेच दुर्गम भागातील वाहतूक विस्कळीत होत असून नक्षली लक्ष्यावर असणारे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पोलिस तसेच सामान्य नागरिकातील संशयित पोलिस खबरे अशा व्यक्तींची हत्या करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केला जातो. मात्र, पोलीस यंत्रणा सतर्क असून नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत आहे. पोलिसांकडूनही फलक लावून नक्षलवाद्यांकडून आदिवासींवर होणारे अन्याय, अत्याचार, पिळवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन केले आहे. तसेच जनजागृती मेळावा, विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन एटापल्ली तालुक्यातील गट्टा, हेडरी, बुर्गी, आलदंडी, हालेवारा, कसनसूर, कोटमी, जाराबंडी इत्यादी पोलिस ठाण्यात करण्यात आले असून यात बहुसंख्य नागरिक सहभागी झाले आहेत. या सर्व घटनांमुळे नक्षलवादी नेते चांगलेच हादरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 2:27 am

Web Title: tribals in gadchiroli burn banners and pamphlets of naxalite
Next Stories
1 लग्नानंतर प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मुलीची वडिलांकडून हत्या
2 ‘इंदू सरकार’ चित्रपटाविरोधात काँग्रेस आक्रमक; ठाणे, कल्याणमध्ये शो बंद पाडले
3 चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवले!
Just Now!
X