नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते. तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी ‘We Want Munde Sir’ तसंच ‘आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा दिल्या. तुकाराम मुंढे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. काहीजणांनी मुंढेंच्या कारसमोर झोपून रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. मुंढे यांची नागपूरमधील नियुक्ती अवघ्या सात महिन्यांसाठी ठरली. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नागपूरच्या आयुक्तपदी असताना सात महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्वाची काम केलं. याच कामांवर टाकलेली नजर…

नागपूर मनपात तुकाराम मुंढेंची धडाक्यात एन्ट्री; पहिल्याच दिवशी घेतला अधिकाऱ्यांचा वर्ग

जानेवारी महिन्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळालं.  त्यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांसमवेत ५० मिनिटांची एक मिटींगही घेतली. तसंच कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त 

मुंढेंच्या दणक्यानंतर खासगी रुग्णालयाने करोनाबाधिताला परत केले ९ लाख ५० हजार रुपये

नागपूर शहरातील वोक्हार्ट आणि सेव्हन स्टार या रुग्णालयांनी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांकडून अधिक शुल्क आकारल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुढें यांनी रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. रुग्णांकडून घेण्यात आलेले अतिरिक्त पैसे परत करण्याचे आदेश आयुक्तांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. ही नोटीस पाठवल्याने रुग्णालयाने रुग्णांना १० लाख रुपये परत केले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Video: ..अन् तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर पाहता पाहता जमीनदोस्त झाला गुंडाचा बंगला

कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभराच्या आतच पहिली मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा न देणाऱ्या मुंढेंच्या आदेशानंतर नागपूरमधील सराईत गँगस्टर असलेल्या संतोष आंबेकरच्या अलिशान बंगल्यावर हातोडा पडला आणि बंगला जमीनदोस्त करण्यात आला. येथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ

मुंढेंनी करुन दाखवलं… पावसाळ्याआधीच नागपूरमधील नद्यांचे झाले पुनरुज्जीवन; पर्यावरण मंत्र्यांनी घेतली दखल

नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हाती घेतलेल्या शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम पावसाळ्याआधीच पूर्ण केले. मुंढे यांनीच यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. मुंढे यांच्या या कामगिरीचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केलं होतं. मुंढे यांच्या ट्विटला कोट करुन रिट्विट करताना आदित्य यांनी नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही बांधील होतो आणि आम्ही ते करुन दाखवलं असं म्हटलं होतं. येथे वाचा सविस्तर वृत्त आणि पाहा नद्यांचे पालटलेले रुप

तुकाराम मुंढेंचा धडाका, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई; PPE किट घालून थेट करोना वॉर्डात

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा एक वेगळा अंदाज जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नागपूरकरांना पहायला मिळाला. करोना लॉकडाउन काळात बाजारपेठेत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर मुंढे यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. यानंतर पीपीई किट घालून मुंढे यांनी नागपूरमधील कोविड रुग्णालयात भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि आरोग्य व्यवस्थेचाही आढावा घेतला. येथे वाचा सविस्तर वृत्त 

वेगाने अन् शिस्तीत काम करा, अन्यथा घरी जा!; तुकाराम मुंढे यांचा सज्जड दम

माझ्या कार्यशैलीला घाबरू नका मात्र, प्रशासकीय सर्व कामे नियमात, शिस्तीने आणि वेगाने करा अन्यथा घरी जा, असा सज्जड दम नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिला. अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेत विविध विभागांच्या विकासकामांचे सादरीकरण दोन दिवसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येथे वाचा सविस्तर वृत्त

तुकाराम मुंढेंचा दणका, कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

जुलै महिन्यामध्ये करोना काळात कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये पाच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच महापालिका मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या विभागाला आकस्मिक भेट दिली. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच करोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. रात्री काम देण्यात आलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. येथे वाचा सविस्तर वृत्त

काम जमत नसेल तर घरी जा; रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

आपलं काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांना दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुढें यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. नागपूर महानगरपालिकेचे अवस्था पाहून त्यांना संताप आल्यानं त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली. येथे वाचा सविस्तर वृत्त

पाणीपट्टीकरात पाच टक्के वाढ होणारच, आयुक्त तुकाराम मुंढे यांची स्पष्टोक्ती

करोनामुळे ज्या प्रमाण जनतेची आर्थिक स्थिती ढासळली आहे तशीच महापालिकेचीही स्थिती आहे. त्यामुळे पाणी पट्टी आणि मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. पाणीपट्टीकरात पाच टक्के वाढ होणारच, अशी भूमिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली होती. येथे वाचा सविस्तर वृत्त

… तर आम्हाला लोकांना जबरदस्ती घरात बसवावं लागेल : तुकाराम मुंढे

“लोकांमध्ये परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. महानगरांमध्ये महत्त्वाच्या सेवा वगळता सर्व काही बंद करण्याचा निर्णय शासनाला नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. लोकांनी लॉक डाऊनचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जर नागरिकांनी बाहेर पडणं कमी केलं नाही तर आम्हाला लोकांना जबरदस्ती घरी बसवावं लागेल,” असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्चमध्ये दिला होता. येथे वाचा सविस्तर वृत्त

मोबाईलची रिंग वाजल्यानं तुकाराम मुंढे संतापले; कर्मचाऱ्यांना घेतलं फैलावर

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एका बैठकीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका कर्मचाऱ्याचा फोनची रिंग वाजल्यानंतर आयुक्त मुंढे संतापले. त्यानंतर त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचा वर्ग घेत सगळ्यानांच सुनावलं. येथे वाचा सविस्तर वृत्त

मुंढे यांच्या संकल्पनेतून साकारले पाच हजार खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’

‘करोना’वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात निर्माण होणारी स्थिती नियंत्रणासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून नागपूरजवळील काटोल मार्गावर येरला येथील राधास्वामी सत्संग संस्थेच्या जागेवर पाच हजार खाटांच्या क्षमतेचे सर्व सोयींनी सुसज्ज ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले. हे काम मे महिन्यामध्येच पार पडेल. येथे वाचा सविस्तर वृत्त

नियम मोडले तर गुन्हा दाखल करू! आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

कुणी नियम मोडताना आढळून आल्यास नागरिकांनी महापालिका आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुलै महिन्यात स्पष्ट केलं होतं. येथे वाचा सविस्तर वृत्त 

करोनाविरुद्ध लढण्यासाठी तुकाराम मुंढेंनी सांगितल्या खास टीप्स

करोनाच्या भितीने मार्च महिन्यामध्ये अनेकांनी सॅनिटायझर आणि मास्कसाठी मेडिकलमध्ये धाव घेतल्याचे चित्र दिसले. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे मास्क आणि बनावट सॅनिटायझर विकले जात असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र भितीमुळे या दोन्ही गोष्टींची मागणी प्रचंड वाढली होती. सर्व गोष्टींचा विचार करता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करुन कोणाला सॅनिटायझर आणि मास्कची गरज आहे कोणाला नाही यासंदर्भातील काही खास टीप्स दिल्या होत्या. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त