News Flash

महामार्गावरील कशेडी घाटात बोगद्याचे काम युद्ध पातळीवर चालू

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली काही वर्षे चालू आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून पुढील वर्षांच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. बोगद्याला जोडणारा भुयारी मार्गही पूर्ण झाला आहे. या बोगद्याचे खेड तालुक्याच्या बाजूने सुरू झालेले कामही वेगाने सुरू असून पुढील वर्षांच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली काही वर्षे चालू आहे. पण मार्गावरील कशेडी घाटात चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्यात येत आहे. घाटात ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीने घेतले. त्यासाठी ४४१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून त्यामध्ये दोन भुयारी मार्ग राहणार आहेत. त्याचबरोबर, ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ता आणि संकटकाळात उपयुक्त वायूवीजन सुविधा असलेले भुयारही या योजनेत समाविष्ट आहे.

या कामापैकी पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गांना जोडणारा भुयारी मार्ग तयार झाला आहे. आतील भागात उलट दिशेला वळून येणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या जोड भुयारी मार्गाद्वारे होईल. डोंगरात खेडच्या बाजूने हे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत साधारणपणे ७३० मीटरचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे.

भुयाराच्या खोदकामासाठी अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बूमर वापरण्यात येत असून, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारातील पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर होतो. हे कातळाचे दगड मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात वापरले जातात. या कामासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:12 am

Web Title: tunnel work in kashedi ghat on the highway continues abn 97
Next Stories
1 चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात चार दिवसांसाठी जनता संचारबंदी
2 रायगड जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ
3 करोना चाचणीचे दर आणखी कमी ! आरटीपीसीआर चाचणीसाठी १२०० रुपये
Just Now!
X