लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७७ वर पोहोचली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ५४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ५२ अहवाल करोना नकारात्मक, दोन अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील ४० वर्षीय पुरुष आणि मलकापूर धरणगांव येथील ७० वर्षीय वृद्धेचा आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४७ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ७४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण १३७० अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.