बाधित महिलेचा मृत्यू

धुळे : साक्री येथील एका करोना बाधीत रुग्णांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला असतानाच धुळे शहरातील मच्छिबाजार परिसरातील ७५ वर्षीय महिलेचा रात्री करोनामुळे मृत्यू झाला. यामुळे करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. शिवाय, गुरुवारी दुपारी आणखी दोन जणांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २७ झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णेचा तरुण तर धुळे शहरातील फिरदोस नगरातील तरुणीचा समावेश आहे.

शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. करोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी दोन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात साक्रीतील ८० वर्षीय रुग्णाचा बुधवारी पहाटे तर धुळे शहरातील ७५ वर्षीय महिलेचा रात्री मृत्यू झाला. साक्रीच्या मृत रुग्णावर साक्रीमध्ये तर धुळे शहरातील मृत महिलेवर वलवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सुमारे ३० संशयितांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथील २८ वर्षीय तरूणाला तर धुळे शहरातील फिरदोस नगरातील २० वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे. यामुळे सध्या धुळे शहर १९, साक्री चार, शिरपूर दोन, शिंदखेडा दोन अशी रुग्णा संख्या असून त्यातील धुळे शहरातील चार तर साक्रीतील दोन असे एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधीत रुग्णांचा मृत्यूदर वाढत असून अजूनपर्यंत एकही रुग्ण बरा होऊन घरी परतलेला नाही. ही चिंतेची बाब असल्याचे अधोरेखित होत आहे.

जमावाची रुग्णवाहिकेवर दगडफेक

वारंवार विरोध करुन, निवेदने देऊनही करोनाबाधित मृत रुग्णांवर देवपूरातील एकवीरा देवी मंदिराच्या मागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला जात असल्यावरून महापालिका प्रशासनासह पोलिसांविरुध्द मध्यरात्री नागरिकांचा उद्रेक झाला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने थेट मृत करोनाबाधित रुग्णांना आणणाऱ्या रुग्णवाहिकेवरच दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन जमावाला पांगविले. परंतू, नागरिकांनी रुअंत्यसंस्कार करण्याला विरोध कायम ठेवल्याने अखेर त्या बाधीत मृत रुग्णावर साक्रीत अंत्यसंस्कार झाले. देवपूरातील स्मशानभूमीत करोनाबाधीत मयतांवर अंत्यसंस्कार करु नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्यावतीने माजी नगरसेवक कैलास चौधरी यांनी मनपा प्रशासनासह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. स्मशानभूमीच्या आजूबाजूला दाट लोकवस्तीचा भाग आहे. करोनाबाधित रुग्णावर येथे अंत्यसंस्कार झाल्यास परिसरात साथ पसरु शकते, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. चार दिवसांपूर्वीच याच स्मशानभूमीत एका करोना बाधीत मृत रुग्णाचा मृतदेह अर्धवट जाळल्याने नागरिक संतप्त झाले होते. यामुळे या ठिकाणी करोना बाधीत मृतदेह न जाळता तो निर्मनुष्य ठिकाणी जाळावा, अशी मागणी नागरिकांची होती. परंतु, महापालिका प्रशासनाने बुधवारी रात्री साक्रीच्या मृत रुग्णाचा मृतदेह देवपूरातील स्मशानभूमी आणला. ही माहिती मिळताच नागरिक आक्रमक झाले. पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला. त्यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन विरोध केला.