प्रदीप नणंदकर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी नवा खांदा शोधला जात आहे.

भाजपाची राज्य व केंद्रात सत्ता आहे. राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येईल असे वातावरण निर्माण केले जात आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री झाल्याने संघटनात्मक कामाचा अनुभव असणारे व लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे नेते असल्याचे सांगण्यात येते.

आता कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा अध्यक्ष भाजपाला हवा आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाकडे अनेक नावे चच्रेत असली तरी मुख्यमंत्रीपद विदर्भाला दिल्याने अध्यक्षपद मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र यांच्या वाटय़ाला दिले जावे, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव चच्रेत आहे. अभाविपमध्ये त्यांनी अनेक वष्रे संघटनात्मक पातळीवर काम केले.

महसूल, सार्वजनिक बांधकाम व कृषी अशी तीन खाते ते मंत्रिमंडळात सांभाळत आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी मिळविलेल्या यशामुळे पाटील यांच्या नावाची चर्चा काही जण करत आहेत.

मात्र, आगामी मंत्रिमंडळात पाटील मुख्य भूमिका बजावतील असे गृहीत धरून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याचा अनुभव असणारे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नावही आघाडीवर आहे. निलंगेकर यांनी लातूर जिल्हय़ाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत यशच मिळविले. लोकसभा निवडणुकीत लातूरबरोबर नांदेड व उस्मानाबाद या दोन जिल्हय़ातील यशामध्येही त्यांचा चांगला वाटा आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाणांनंतर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे द्यायची अशा सक्षम खांद्याचा शोध सुरू झाला आहे. राज्यात अनेक नावे यासाठी चर्चिली जात असली तरी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस गोवा प्रांताचे प्रभारी लातूरचे आमदार अमीत देशमुख यांचेही नाव चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमीत देशमुख यांचे वक्तृत्व चांगले आहे. त्यांना प्रश्नांची जाण असल्याचा दावा कार्यकर्ते करतात. कॉंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांची ओळख आहे, शिवाय त्यांचे वय हे तरुणांना आकर्षति करणारे असल्याने त्यांच्या नावाची चर्चा असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

‘दैनंदिन कामासाठी मी दिल्लीत आलो होतो. प्रदेशाध्यक्षपदासाठी नावे चर्चेत आहेत. त्यात माझेही नाव असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.’

अमीत देशमुख, आमदार लातूर